शेअर ट्रेडिंगमध्ये नफ्याचे आमीष, कॉम्प्युटर शॉपच्या मालकाला १८ लाखांनी गंडविले
By दयानंद पाईकराव | Updated: June 30, 2024 16:21 IST2024-06-30T16:20:59+5:302024-06-30T16:21:40+5:30
आरोपीने मानकर यांना कोणताही नफा न देता व त्यांची मुळ रक्कम परत न करता त्यांची फसवणूक केली.

शेअर ट्रेडिंगमध्ये नफ्याचे आमीष, कॉम्प्युटर शॉपच्या मालकाला १८ लाखांनी गंडविले
नागपूर : शेअर ट्रेडिंगमध्ये अधिक नफा होत असल्याचे आमीष दाखवून सायबर गुन्हेगाराने कॉम्प्युटर हार्डवेअरचे शॉप असलेल्या मालकाला १८ लाखांनी गंडविले. ही घटना एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत २० मे ते १५ मे २०२४ दरम्यान घडली.
दत्तु हिरामण मानकर (३५, रा. दाते ले आऊट, शारदानगर, जयताळा) असे फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्यांचे मानकापूर परिसरात कॉम्प्युटर हार्डवेअर शॉप आहे. मानकर यांना मोबाईल क्रमांक ४४७४१८५१८६३ या वरून कॉल आला. आरोपीने बनावट शेअर्स ट्रेडिंग अॅप तयार करून शेअर्स ट्रेडींगमध्ये गुंतवणूक केल्यास जास्त नफा मिळेल, असे आमीष दाखविले. त्याच्यावर विश्वास ठेऊन मानकर यांनी आरोपीच्या बँक खात्यावर ऑनलाईन १८ लाख ६ हजार ३०० रुपये पाठविले.
परंतु आरोपीने मानकर यांना कोणताही नफा न देता व त्यांची मुळ रक्कम परत न करता त्यांची फसवणूक केली. मानकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून एमआयडीसी ठाण्याचे उपनिरीक्षक जितेश आरवेल्ली यांनी अज्ञात आरोपीविरुद्ध कलम ४१९, ४२०, ४६५, ४६७, ४६८, ४७१, ३४, सहकलम ६६ (क), ६६ (ड) नुसार गुन्हा दाखल करून तपास सुरु केला आहे.