नागपुरातले लकडगंज पोलीस स्टेशन राज्यात सर्वात स्मार्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2019 10:28 AM2019-11-29T10:28:24+5:302019-11-29T10:29:43+5:30

राज्यातील सर्वात स्मार्ट पोलीस स्टेशन म्हणून निर्मितीपूर्वीच पोलीस दलात चर्चेला आलेल्या लकडगंज पोलीस ठाण्याचे बांधकाम पूर्ण झाले आहे.

The Lucknowganj police station in Nagpur is the smartest in the state | नागपुरातले लकडगंज पोलीस स्टेशन राज्यात सर्वात स्मार्ट

नागपुरातले लकडगंज पोलीस स्टेशन राज्यात सर्वात स्मार्ट

googlenewsNext
ठळक मुद्देउद्घाटनाची प्रतीक्षा, कामकाज सुरू होणार बांधकाम पूर्ण

नरेश डोंगरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्यातील सर्वात स्मार्ट पोलीस स्टेशन म्हणून निर्मितीपूर्वीच पोलीस दलात चर्चेला आलेल्या लकडगंज पोलीस ठाण्याचे बांधकाम पूर्ण झाले आहे. सौंदर्यीकरणासह फर्निचरचे कामही पुढच्या दोन ते तीन दिवसांत पूर्ण होणार आहे. या पोलीस ठाण्याचे उद्घाटन मुख्यमंत्री किंवा गृहमंत्र्यांच्या हस्ते (किंवा दोघांच्याही उपस्थितीत) होणार आहे. मात्र, उद्घाटनापूर्वीच पुढच्या आठवड्यात या ठाण्यातून कामकाज सुरू होण्याचे संकेत आहेत. या पार्श्वभूमीवर, पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय आणि अन्य वरिष्ठांनी गुरुवारी या पोलीस ठाण्याला भेट देऊन येथील पाहणी केली.
अत्यंत गजबजलेल्या व्यापारपेठेच्या मधोमध दीड ते दोन एकर जागा असूनही, लकडगंज पोलीस स्टेशनचा कारभार जीर्ण झालेल्या वास्तूतूनच सुरू होता. या भागात गुन्हेगारी आणि अवैध धंद्यांची बजबजपुरी होती. मध्य भारतातील मोठा रेडलाईट एरिया ‘गंगाजमुना’ याच पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर आहे. असे असताना येथे तक्रारकर्त्यांना सोडा, ठाण्यातील पोलिसांनाही बसायला पुरेशी जागा नव्हती. या पार्श्वभूमीवर, दोन वर्षांपूर्वी राज्यातील सर्वात स्मार्ट पोलीस स्टेशन म्हणून लकडगंज पोलीस ठाण्याच्या इमारतीच्या बांधकामाचा निर्णय घेतला गेला. त्यानुसार, १४४ कोटी ९६ लाख रुपये खर्ची घालून हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्णत्वास आला आहे. गृहखात्याचाही कारभार सांभाळणारे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट होता. तो लवकरात लवकर पूर्ण व्हावा, यासाठी त्यांनी पोलीस आयुक्तांमार्फत या पोलीस ठाण्याच्या निर्मितीवर खास लक्ष पुरविले होते. वेळोवेळी ते बांधकामाचा आढावाही घेत होते. अखेर हे पोलीस ठाणे बांधून पूर्ण झाले. त्याची आतून-बाहेरून रंगरंगोटी आणि सौंदर्यीकरणाचेही काम अंतिम टप्प्यात आहे. राज्याचे नवीन मुख्यमंत्री किंवा गृहमंत्री (किंवा दोन्हीही) या स्मार्ट पोलीस ठाण्याचे उद्घाटन (लोकार्पण सोहळा) लवकरच करतील. त्यासाठी पोलीस महासंचालनालयातून तयारी सुरू आहे. तत्पूर्वीच पुढच्या चार-पाच दिवसांत या ठाण्यातून कामकाज सुरू होण्याचेही संकेत मिळाले आहेत. या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी गुरुवारी दुपारी लकडगंज पोलीस ठाण्याला भेट देऊन तेथील कोणती कामे पूर्ण व्हायची आहेत, त्याची माहिती ठाणेदार नरेंद्र हिवरे यांच्याकडून जाणून घेतली. अतिरिक्त पोलीस आयुक्त (गुन्हे) नीलेश भरणे आणि अतिरिक्त पोलीस आयुक्त शशिकांत महावरकर आणि उपायुक्त राहुल माकणीकर हेदेखील यावेळी पोलीस आयुक्तांसोबत होते.
सभागृहासह व्यावसायिक संकुलही
ठाण्याच्या परिसरातील जागेतच पोलीस कर्मचाऱ्यांसाठी ३०० सदनिका (जी प्लस ११) आणि पोलीस निरीक्षकांसाठी ४८ सदनिका बांधण्यात आल्या आहेत. दर्शनीभागात व्यावसायिक संकुल अन् प्रशस्त सभागृहदेखील आहे. येथेच क्लब हाऊस, जिम्नॅशियम आहे. खेळण्यासाठी ३ हजार चौरस फुटांचे मैदान आहे आणि अद्ययावत अग्निशमन यंत्रणेसह ६५ किलोवॅट विद्युत सौर ऊर्जा निर्मितीची व्यवस्था करण्यात आली आहे.
पोलीस ठाण्याची वैशिष्ट्ये!
१९३६५ चौरस मीटर जमीन क्षेत्रफळावर पोलीस ठाण्यासह अन्य कार्यालय आणि सदनिकांचे बांधकाम करण्यात आले आहे. याच ठिकाणी पोलीस उपायुक्त (डीसीपी) आणि सहायक आयुक्तांचेही (एसीपी) कार्यालय आहे. पोलीस ठाण्याच्या इमारतीत मिटिंग हॉल आणि येथे येणाऱ्यांसाठी बसण्याची प्रशस्त/आरामशीर व्यवस्था आहे. गुन्हेगारांना डांबण्यासाठी एक-दोन नव्हे तर चार लॉकअप (शहरातील अनेक पोलीस ठाण्यात लॉकअपच नाहीत) आहेत.

Web Title: The Lucknowganj police station in Nagpur is the smartest in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.