एलपीजी सबसिडीचा फायदा फक्त गरजूंनाच मिळावा
By Admin | Updated: November 23, 2014 00:35 IST2014-11-23T00:35:59+5:302014-11-23T00:35:59+5:30
देशहितासाठी एलपीजी सबसिडीचा फायदा केवळ गरजूंनाच मिळावा, असे आवाहन उद्योजक नितीन खारा यांनी आज केले. खारा यांनी त्यांना एलपीजीवर मिळणारी सबसिडी शासनाला परत केली आहे.

एलपीजी सबसिडीचा फायदा फक्त गरजूंनाच मिळावा
उद्योजक नितीन खारा यांचे आवाहन : सबसिडी नाकारली
नागपूर : देशहितासाठी एलपीजी सबसिडीचा फायदा केवळ गरजूंनाच मिळावा, असे आवाहन उद्योजक नितीन खारा यांनी आज केले. खारा यांनी त्यांना एलपीजीवर मिळणारी सबसिडी शासनाला परत केली आहे.
पत्रपरिषदेत खारा यांनी सांगितले की, मुलांना ४० ते ५० हजार रुपयांचा मोबाईल घेऊन देणारे लोक शासनाच्या ५०० रुपयांच्या सबसिडीचा फायदा घेतात.
समाजात असाही एक वर्ग आहे की, सिनेमाचे २५० रुपयांचे तिकीट खरेदी करतात आणि सोबतच २५० रुपयांचे पॉपकॉर्न खातात, पण ५०० रुपयांची सबसिडी सोडत नाहीत. एलपीजी जीवनाचा महत्त्वपूर्ण भाग आहे. सिलिंडरच्या भावातील चढ-उताराचा प्रत्येकाला त्रास होतो. काही लोक असेही आहेत की, ज्यांना सबसिडीचा फायदा मिळत नाही. जे फायदा घेतात, त्यांच्यामुळे राष्ट्रीय बजेटवर परिणाम पडतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून प्रेरणा घेऊन सबसिडी परत केली आहे. यापुढे घरगुती सबसिडीचा फायदा घेणार नाही. चांगल्या कामाची सुरुवात स्वत:पासूनच केली आहे.
डीलरला सबसिडी परत करण्याचा अर्ज देऊन तेल कंपनीच्या वेबसाईटवर आपल्या मागणीची नोंद केली आहे. हे छोटेसे पाऊल, पण महत्त्वपूर्ण आणि देशाच्या विकासात योगदान ठरणारे आहे.
खारा म्हणाले की, देशात आयात करण्यात येणाऱ्या पेट्रोलियम पदार्थांवर परकीय चलन खर्च होते. गरज नसलेल्यांना सबसिडी मिळत आहे. त्यामुळे देशाचे नुकसान होत आहे.
सर्व बाबींचा विचार करून सबसिडी परत करण्याचा निर्णय घेतला आहे. पुढे अनेक लोक सबसिडी परत करतील, असा विश्वास नितीन खारा यांनी व्यक्त केला.(वाणिज्य प्रतिनिधी)