प्रेमी युगुलाने जाळून घेतले
By Admin | Updated: April 21, 2017 03:03 IST2017-04-21T03:03:40+5:302017-04-21T03:03:40+5:30
प्रेमी युगुलाने स्वत:च स्वत:च्या अंगावर पेट्रोल ओतून जाळून घेतले. त्यात दोघेही गंभीररीत्या भाजले.

प्रेमी युगुलाने जाळून घेतले
तरुणीचा मृत्यू तर तरुणाची मृत्यूशी झुंज : हिंगणा तालुक्याच्या खडकी शिवारातील घटना
कान्होलीबारा : प्रेमी युगुलाने स्वत:च स्वत:च्या अंगावर पेट्रोल ओतून जाळून घेतले. त्यात दोघेही गंभीररीत्या भाजले. यातील तरुणीचा नागपूर येथील मेडिकल हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला तर तरुणावर मेडिकल हॉस्पिटलमध्येच उपचार सुरू आहे. तो अत्यवस्थ असून, मृत्यूशी झुंज देत असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली. ही घटना मंगळवारी सकाळी हिंगणा तालुक्यातील खडकी शिवारातील शेतात घडली.
आरती मारोतराव कोहचाडे (१९, रा. खडकी, ता. हिंगणा), असे मृत तरुणीचे नाव असून, स्वप्निल देवीदास उईके (२२, रा. खडकी, ता. हिंगणा) असे अत्यवस्थ असलेल्या तरुणाचे नाव आहे. दोघेही एकाच गावातील रहिवासी असल्याने त्यांची आपसांत ओळख होती. पुढे या ओळखीचे रूपांतर मैत्री आणि नंतर प्रेमसंबंधात झाले.
कदाचित या दोघांचा लग्न करण्याचा विचार असावा. परंतु, स्वप्निल हा लग्न करण्यास चालढकल करीत असल्याने या दोघांमध्ये वाद निर्माण झाला होता.
त्यातच दोघे मंगळवारी सकाळी ६.३० वाजताच्या सुमारास खडकी शिवारातील स्वप्निलच्या शेतात भेटले. शेतातील नागोबाच्या मंदिराजवळ या दोघांमध्ये वाद निर्माण झाल्याने दोघेही भांडायला लागले. त्यातच राग अनावर झाल्याने आरतीने स्वत:च्या अंगावर पेट्रोल ओतून जाळून घेतले आणि ती जळालेल्या अवस्थेत स्वप्निलला बिलगली. यात आरती ८० टक्के तर स्वप्निल ९० टक्के जळाला. स्वप्निलने कशीबशी स्वत:ची सुटका करून गावाकडे धूम ठोकली. हा प्रकार निदर्शनास येताच शेजारच्या शेतातील नागरिकांनी तिच्याकडे धाव घेतली. नागरिकांनी दोघांनाही लगेच नागपूर येथील मेडिकल हॉस्पिटलमध्ये भरती केले आणि हिंगणा पोलिसांना सूचना दिली. तिथे आरतीचा बुधवारी दुपारी २.४५ वाजताच्या सुमारास उपचारादरम्यान मृत्यू झाला. स्वप्निल अत्यवस्थ असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली. हिंगणा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. (वार्ताहर)
पेट्रोल आले कुठून?
आरतीने स्वत:च्या अंगावर पेट्रोल ओतून स्वत:ला जाळून घेतले. याला हिंगणा पोलिसांनीही दुजोरा दिला आहे. ही घटना शेतातील नागोबा मंदिराजवळ घडली. आरतीने स्वत:ला जाळून घेण्यासाठी पेट्रोलचा वापर केला. घटनास्थळी दुचाकीही नव्हती. मग, तिच्याजवळ पेट्रोल आले कुठून, पेट्रोल कुणी व कसे आणले, हा प्रश्न अनुत्तरित आहे. स्वप्निल याहीवेळी लग्नाला टाळाटाळ करणार असल्याची कदाचित तिला जाणीव असावी. यातून तिने सदर पाऊल उचलले असावे, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.