पगारासाठी गमावला जीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2015 03:11 IST2015-11-26T03:11:45+5:302015-11-26T03:11:45+5:30

पगार मागण्याच्या कारणावरून एका युवकाला बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीत जखमी युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Lost organisms for salaries | पगारासाठी गमावला जीव

पगारासाठी गमावला जीव

जखमी तरुणाचा मृत्यू : मृतदेहासह सक्करदरा पोलीस ठाण्याला घेराव
नागपूर : पगार मागण्याच्या कारणावरून एका युवकाला बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीत जखमी युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. युवकाच्या हत्येमुळे पीडित कुटुंबीयांनी पोलिसांवर हलगर्जीपणा करीत असल्याचा आरोप करीत बुधवारी मृतदेहासह सक्करदरा पोलीस ठाण्याला घेराव घातला. यामुळे काही वेळ तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली होती. रवी प्रभाकर नाईक (३३) रा. नंदनवन असे मृताचे नाव आहे.
रवी पूर्वी इतवारी येथील एका दुकानात काम करीत होता. तो सव्वा महिन्यापूर्वी राहुल हरडेच्या भांडेप्लॉट चौक सक्करदरा येथील जॉब प्लेसमेंट एजन्सीमध्ये आला होता. राहुलने त्याला एका हॉटेलमध्ये अकाऊंटंटची नोकरी लावून दिली. पाच हजार रुपये पगार निश्चित करण्यात आला. महिना संपत आला असताना रवी वेतन मागू लागला. तेव्हा त्याचे वेतन राहुलला देण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे १६ नोव्हेंबर रोजी दुपारी तो राहुलच्या कार्यालयात पगार मागण्यासाठी आला. तिथे त्याला मारहाण करण्यात आली. मारहाणीत तिसऱ्या माळ्यावरून पडल्याने रवी गंभीर जखमी झाला. त्याच्यावर उपचार सुरू होते. २० नोव्हेंबर रोजी त्याने दिलेल्या बयानाच्या आधारावर सक्करदरा पोलिसांनी राहुल आणि त्याची कर्मचारी स्नेहाच्या विरोधात हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला. मंगळवारी उपचारादरम्यान रवीचा मृत्यू झाला.
रवीचा भाऊ गणेश याच्यानुसार १६ नोव्हेंबर रोजी रात्री त्याचे रवीसोबत बोलणे झाले. तेव्हा रवीने सांगितले होते की, राहुलने दोन महिला कर्मचाऱ्याच्या मदतीने त्याला मारहाण केली. त्यानंतर त्याला तिसऱ्या माळ्यावरून धक्का दिला. तो समजदार होता. तो स्वत: तिसऱ्या माळ्यावरून उडी घेणार नाही. तसेच राहुलने रवीच्या विरुद्ध छेडखानी आणि आत्महत्येचा प्रयत्न करण्याची तक्रार दाखल करण्याची धमकी दिली होती. रवीचे वडील प्रभाकर नाईक यांनीसुद्धा राहुलने अशी धमकी दिल्याचे पोलिसांना तोंडी सांगितले होते. परंतु पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष केले. राहुलचे काही नेत्यांसोबत संबंध आहेत. त्यामुळे पोलिसही त्याच्याविरुद्ध कारवाई करण्यास मागे-पुढे पाहत असल्याचा गणेशचा आरोप आहे.
बुधवारी पोस्टमार्टमनंतर रवीचे कुटुंबीय मृतदेहासह सक्करदरा पोलीस ठाण्यात पोहोचले. त्यांच्यासोबत युवक काँग्रेस अध्यक्ष बंटी शेळके आणि त्यांचे कार्यकर्तेसुद्धा होते. त्यांनी पोलिसांच्या विरोधात नारेबाजी केली, तसेच आरोपीला तातडीने अटक करण्याची मागणी केली. दरम्यान, गुन्हे शाखेचे डीसीपी रंजन शर्मा, एसीपी बाबासाहेब बुधवंत ठाण्यात पोहोचले. त्यांनी पीडिताच्या कुटुंबीयांना गुन्हेगारांना तातडीने अटक करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर कुटुंबीय शांत झाले. निदर्शनात बंटी शेळके यांच्यासह प्रवीण पोटे, अनुप कोंडापूरवार, चक्रधर भोयर, उदय डोमने, राकेश निकोसे, मोचीराम मोहाडीकर, प्रशांत यचेरवार, शेखर पौनीकर आदी सहभागी होते.

Web Title: Lost organisms for salaries