जलालखेडा : रविवारी आलेल्या वादळी पावसामुळे नरखेड तालुक्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वादळ आणि विजांमुळे देवग्राम येथील नागरिकांच्या घरातील विद्युत मीटर, लाईट, पंखे, टीव्ही, फ्रिज, घरगुती पाण्याची मोटार, मोबाईल अशी अनेक विद्युत उपकरणे पूर्णपणे खराब झाली आहेत. हा प्रकार वादळी वाऱ्यामुळे नव्हे, तर महावितरण कंपनीच्या चुकीमुळे घडला असल्याचा आरोप देवग्राम येथील नागरिकांनी केला आहे. नागरिकांच्या म्हणण्यानुसार गावातून ११ के.व्ही.च्या विद्युततारा गेल्या आहे. त्याच तारांच्या खालून घरगुती विद्युत प्रवाहाचे खांब आहेत. ११ केव्हीच्या दोन खांबांमधील अंतर जास्त असल्याने वाऱ्यामुळे ११ के.व्ही.च्या विद्युत तारेचा स्पर्श घरगुती विद्युत तारेला झाल्याने हा सर्व प्रकार घडला. गावातील २० ते २२ नागरिकांच्या घरांतील वीज मीटर वितळले असून टीव्ही, फ्रिज, पंखे, मोटर अशी अनेक विद्युत उपकरणे खराब झाली आहेत. त्यामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई महावितरण कंपनीने करावी, अशी मागणी देवग्राम येथील नागरिकांनी केली आहे. देवग्राम ग्राम पंचायतीच्या वतीने महावितरण कार्यालय, खैरगावला पत्र देण्यात आले होते. यात ११ केव्ही आणि एल.टी. लाईनमधील अंतर खूप कमी आहे. त्यामुळे त्या घरगुती वापराच्या विद्युतप्रवाहाच्या तारेला गार्डनिंग करणे गरजेचे आहे. परंतु याकडे महावितरण कंपनीकडून दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे वेळीच याकडे लक्ष दिले असते तर हा प्रकार घडला नसता व नागरिकांचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले नसते.
रविवारी आलेल्या वादळी वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणत विद्युततारा तुटल्या. काही ठिकाणी विद्युत तारांवर झाड कोसळल्यामुळे शॉर्ट सर्किट होऊन देवग्राम येथील काही ग्राहकांच्या घरातील मीटर खराब झाले. याबाबतची माहिती मिळताच सर्व ग्राहकांच्या घरातील विद्युत मीटर बदलून देण्यात आली आहेत.
- सुरेंद्र बागडे, उपकार्यकारी अभियंता, खैरगाव.
-
देवग्राम येथील वस्तीतून ११ केव्हीची लाईन गेली आहे. कित्येकदा महावितरण कार्यालयाला गर्डिग्न लावण्याबाबत निवेदन देण्यात आले. तसेच ११ केव्हीच्या दोन पोलमधील अंतर २०० फुटांपेक्षा जास्त नको. परंतु गावातून गेलेल्या ११ केव्हीच्या खांबांमधील अंतर ६०० फुटांपेक्षा जास्त आहे. ११ के.व्ही.च्या तारा इतक्या खाली आल्या आहेत की त्या स्ट्रीट लाईटच्या तारांना स्पर्श करतात. त्यामुळे हा प्रकार घडला आहे.
- योगेश सरोदे, ग्रामवासी, देवग्राम