रिपब्लिकन निष्ठा गमावल्याने आंबेडकरी राजकारणाची वाताहत ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 04:08 IST2020-12-25T04:08:56+5:302020-12-25T04:08:56+5:30
नागपूर : डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रारूप तयार करून दिलेल्या रिपब्लिकन पक्षाबद्दलची निष्ठा गमावल्यानेच आंबेडकरी राजकारणाची पुरती वाताहत झाली, ...

रिपब्लिकन निष्ठा गमावल्याने आंबेडकरी राजकारणाची वाताहत ()
नागपूर : डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रारूप तयार करून दिलेल्या रिपब्लिकन पक्षाबद्दलची निष्ठा गमावल्यानेच आंबेडकरी राजकारणाची पुरती वाताहत झाली, अशी खंत ज्येष्ठ पत्रकार व आंबेडकरी विचारवंत प्रा. रणजित मेश्राम यांनी व्यक्त केली. सामाजिक कार्यकर्ता अनिल वासनिक यांनी लिहिलेल्या ‘नागपूर महानगरातील आंबेडकरी राजकारण : ताैलनिक विश्लेषण’ या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात ते बाेलत हाेते.
प्रेस क्लब येथे झालेल्या या समारंभात मिलिंद फुलझेले, अशाेक सरस्वती, उष:काल प्रकाशनचे प्रा. रत्नाकर मेश्राम उपस्थित हाेते. प्रा. रणजित मेश्राम म्हणाले, कधीकाळी रिपब्लिकन विचारधारेचे नागपूरसह राज्याच्या राजकारणात प्राबल्य हाेते. नागपूर महापालिकेच्या सत्तेत या पक्षाचे वर्चस्व हाेते. एखादी संघटना किंवा पक्ष खंडित करण्यासाठी त्याच्या विचारधारेवरील निष्ठा संपवावी लागते. इतर पक्षांनी त्याचे प्रयत्न जाेरात केले पण दुर्दैवाने दलित नेत्यांनीच त्याचा कळस घातला. आधी यांनी रिपब्लिकन संकल्पना साेडून वेगळ्या संघटना व पक्ष काढले व लाेकांच्या मनातील या विचारधारेची निष्ठा संपवली. त्यानंतर हे नेते पुन्हा रिपब्लिकन झेंडे घेऊन आले पण उशीर झाला. ताेपर्यंत राजकारणातील रिपब्लिकन वर्चस्वच संपले आणि आंबेडकरी चळवळ अनाथालयात गेली. १९५२ पासूनचा आनंददायी आलेख २०२० येतायेता क्लेषदायक झाला. आंबेडकरी समाजाची ही वेदना वासनिक यांनी व्यवहारिकपणे या पुस्तकात मांडल्याची भावना प्रा. मेश्राम यांनी व्यक्त केली.
अशाेक सरस्वती म्हणाले, बुद्धिजीवी समाजाचे नियंत्रण राहिले नसल्याने राजकारणाचा साैदा करणाऱ्यांकडे आंबेडकरी चळवळीची सूत्रे गेली. आज बहुजन समाज भयंकर परिस्थितीतून जात आहे. संविधानाचा खाेका केला जात आहे. आरक्षण संपवले जात आहे व बहुजनांना शिक्षणातून बाद केले जात आहे. अशावेळी भावनिक राजकारण साेडून मुद्द्यावरील आंदाेलनाची, चांगल्या नेतृत्वाची व याेजनाबद्ध राजकारणाची गरज आहे. हे पुस्तक निवडणुकांचे विश्लेषण नाही तर आंबेडकरी राजकारणाचा मार्गदर्शक दस्तावेज आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. मिलिंद फुलझेले यांनी राजकारणात दलित नेत्यांनी आंबेडकरी समाजाचा फुटबाॅल केल्याची टीका केली. रिपब्लिकन अस्तित्व कुणाच्याही दावणीला बांधले आहे. समतेची एवढी महान विचारधारा असलेल्या पक्षाचो दुरावस्था का झाली, याचे चिंतन करावे लागेल, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाचे संचालन गझलकार कवी हृदय चक्रधर यांनी केले.