कुही : मार्च महिन्यांपासून कोरोनाच्या संक्रमणामुळे शाळा बंद करण्यात आला. त्यावर ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय देण्यात आला. मात्र ग्रामीण भागात ऑनलाईन शिक्षण पद्धतीला हवे तितके यश मिळून शकले नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे. राज्य सरकारने काही दिवसांपूर्वी शाळा व कनिष्ठ महाविद्यालय (इयत्ता ९ ते १२) सुरु करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र दिवाळीनंतर जिह्यातील शिक्षक कोरोनाबाधित होण्याचे प्रमाण वाढल्याने हा निर्णय रद्द करण्यात आला. जिल्ह्यात १३ डिसेंबर पर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे.
शाळा बंद असल्यातरी शासनाने घालून दिलेल्या नियमानुसार विद्यार्थ्यांना ऑनलाईन मार्गदर्शन करणे सुरू आहे. ग्रामीण भागात पालकाजवळ मोबाईल तर आहे तर नेट रिचार्ज करताना त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो आहे. लॉकडाऊनमुळे ग्रामीण अर्थव्यवस्था कोलमडली आहे. अनेकांचे रोजगार हिरावले गेले आहे. अशात महागड्या ऑनलाईन शिक्षणाकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरवल्याचे चित्र कुही तालुक्यात दिसून येत आहे.