भगवान महावीर जगातील मोठे पर्यावरणवादी
By Admin | Updated: April 20, 2016 03:02 IST2016-04-20T03:02:44+5:302016-04-20T03:02:44+5:30
खासदार विजय दर्डा म्हणाले, आजचा दिवस जैनांचाच नव्हे तर संपूर्ण जगाचा आणि विश्वातील लोकांचा दिवस आहे.

भगवान महावीर जगातील मोठे पर्यावरणवादी
भगवान महावीर यांच्या उपदेशाचा जगभरात स्वीकार
खासदार विजय दर्डा म्हणाले, आजचा दिवस जैनांचाच नव्हे तर संपूर्ण जगाचा आणि विश्वातील लोकांचा दिवस आहे. भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव आणि त्यांचा उपदेश जगाने स्वीकारला आहे. त्यांनी २६४२ वर्षांपूर्वी दिलेला शुभसंदेश महत्त्वपूर्ण आहे. त्यांचे प्रवचन आणि उपदेशात अहिंसा, सत्य, करुणा, प्रेम, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रहाचे अतिशय महत्त्व आहे. महात्मा गांधी मन, वचन आणि कर्माने जैन बनले होते. सत्य, अहिंसा, पर्यावरणासाठी भगवान महावीर महान होते. व्यक्ती जन्माने तर जैन आहे, पण तो मनाने जैन बनला पाहिजे, असे त्यांनी सांगितले होते.
नागपूर : भगवान महावीर जगातील मोठे पर्यावरणवादी होते. पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी ४२ वर्षे त्यांनी भारतभ्रमण केले. त्यांनी समाजाला दिलेली शिकवण प्रत्येकाने आचरणात आणण्याची गरज असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी येथे केले.
चिटणीस पार्क, महाल येथे श्री जैन सेवा मंडळातर्फे भगवान महावीर जन्मकल्याणक ‘महोत्सव-२०१६’ या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय अल्पसंख्यक कल्याण मंत्री नजमा हेपतुल्ला, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, लोकमत समूहाच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन व सकल जैन समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार विजय दर्डा, खासदार अजय संचेती, आमदार कृष्णा खोपडे, विकास कुंभारे, गिरीश व्यास, अनिल सोले, सुनील केदार, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निशा सावरकर, मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी मुनिराज प्रशमरति विजय म.सा., मुनिश्री सुपार्श्वसागर महाराज, गुणनंदीजी, क्षुल्लक गुननंदीजी यांनी उपस्थितांना शुभाशीर्वाद दिले.(प्रतिनिधी)
स्वत:तील वाईट प्रवृत्तीवर विजय मिळवा
मुख्यमंत्री म्हणाले, प्रत्येक व्यक्तीने स्वत:च्या वाणी बुद्धीवर विजय मिळविण्याची शिकवण भगवान महावीर यांनी दिली. दुसऱ्याशी संघर्ष करण्यापेक्षा स्वत:तील वाईट प्रवृत्तीवर विजय प्राप्त करण्याचा संदेश दिला. हा संदेश प्रत्येकाने आत्मसात करण्याची गरज आहे. राज्यात गोहत्याबंदी कायदा लागू करून भूतदयेचा विचार समाजात प्रस्थापित करण्याचा प्रयत्न शासनाने केला आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनातून गोधन व पशुधन कमी झाल्यास त्याचा परिणाम कृषिव्यवस्थेवर होतो. त्याचे वाईट परिणाम आता आपण राज्यात भोगत आहोत, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
शासन जैन समाजाच्या पाठीशी
नाशिक जिल्ह्यात मांगीतुंगी महोत्सव सरकारने पुढाकार घेऊन साजरा केला. या परिसराचा तीर्थस्थळ म्हणून विकास करण्यासाठी १०० कोटी रुपयांचा निधी शासनाने दिला. त्यापैकी ४० कोटी रुपये खर्च झाले आहेत. महाराष्ट्रात पहिल्यांदाच अशाप्रकारे हा महोत्सव साजरा करण्यासाठी शासनाने पुढाकार घेतला आहे. जैन समाज हा प्रागतिक समाज आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेत मोठा वाटा आहे. व्यापार वाढविण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका आहे. त्यामुळे शासन ठामपणे जैन समाजाच्या पाठीशी राहील, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. जैन समाज अर्थव्यवस्थेचा हिस्सा असून देशाच्या विकासात त्यांची महत्त्वाची भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले.
शैक्षणिक क्षेत्रात जैन समाजाची उल्लेखनीय कामगिरी
केंद्रीय अल्पसंख्यक कल्याण मंत्री नजमा हेपतुल्ला यांनी सांगितले की, शैक्षणिक क्षेत्रात जैन समाजाचे मोठे योगदान आहे. नागपुरात असताना मुनींचा आशीर्वाद घेण्याची इच्छा होती. ती पूर्ण झाली. समाजाच्या प्रत्येक कार्यात सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण
भगवान महावीर जयंतीनिमित्त मंगळवारी सकाळी ७.३० वाजता श्री दिगंबर जैन परवार मंदिरातून शोभायात्रा काढण्यात आली. विविध मार्गाने चिटणीस पार्क येथे पोहोचली. शोभायात्रेच्या माध्यमातून अहिंसेचा संदेश देण्यात आला. सुरुवातीला मुख्यमंत्र्यांनी ध्वजारोहण व दीपप्रज्वलन केले. यावेळी मुख्यमंत्र्यांचा शाल-श्रीफळ व पगडी देऊन सत्कार करण्यात आला. स्मृतिचिन्हाचे प्रकाशन त्यांच्या हस्ते करण्यात आले.
विजय दर्डा यांचा सत्कार
यावेळी स्वागत समितीच्या वतीने खासदार विजय दर्डा आणि काँग्रेसच्या प्रदेश सचिवपदी निवडीबद्दल अतुल कोटेचा यांचा सत्कार करण्यात आला.
गोवंश हत्याबंदीबद्दल
शासनाचे अभिनंदन
प्रारंभी श्री जैन सेवा मंडळाचे अध्यक्ष मनीष मेहता यांनी प्रास्ताविक भाषण केले. राज्यात गोवंश हत्याबंदी केल्याबद्दल शासनाचे अभिनंदन केले. ही संस्था समस्त जैन समाजाची एकमात्र प्रतिनिधी संस्था आहे. यात ८५ संस्थांचा समावेश असून, ६५ हजार सदस्य असल्याचे सांगितले. संस्थेतर्फे अहिंसा अवॉर्ड देण्यात येतो.
मुख्यमंत्र्यांनी दिले आश्वासन
नागपुरातून सम्मेदशिखर आणि पालीताना येथे थेट रेल्वे सुरू करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवावा, अशी मागणी प्रास्ताविकेत मनीष मेहता यांनी केली. विहारमध्ये प्रत्येक २५ ते ३० कि़मी. अंतरावरील शाळांमध्ये एक खोली बांधण्याची परवानगी मिळावी. त्यामुळे मुनी महाराजांना पायदळ विहार करण्याची सुविधा उपलब्ध होईल. चॅरिटी संस्था चालविण्यासाठी इस्पितळ, शाळा, कॉलेज आदींसाठी जागा उपलब्ध करून द्यावी. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी त्यांना यथोचित चर्चा करण्याचे आश्वासन दिले.
सर्वांकडे विद्या आहे, पण आत्मज्ञान नाही
मुनिश्री सुपार्श्वसागर महाराज यांनी सांगितले की, सर्वांकडे विद्या आहे, पण आत्मज्ञान नाही. पोट भरण्याचे ज्ञान आहे. विद्येसाठी विनय पाहिजे. एकतेने संपत्ती येते. त्याचे दान केले पाहिजे. भगवान महावीर यांनी सर्वांशी मैत्रीभाव ठेवणे, गुणीजनांचा आदर आणि सर्व प्राणिमात्रांवर दया करण्यास सांगितले आहे. दयेविना धर्म नाही. मनुष्य जन्म मिळणे कठीण आहे. आत्मकल्याणासाठी उपकार, स्वाध्याय व देवपूजा करा आणि अखेर मोक्ष प्राप्त करा. प्रशमरति विजयजी म.सा. यांचा उपदेश सतीश पेंढारी यांनी वाचून दाखविला.
मान्यवरांची उपस्थिती
कार्यक्रमाचे संचालन मंत्री सतीश पेंढारी (जैन) यांनी केले. समारंभात नगरसेविका आभा पांडे, अतुल कोटेचा, संतोष जैन, नरेंद्र बरडिया, राकेश पाटणी, सतीश जैन, जयप्रकाश गुप्ता, नितीन महाजन, रमेश तुपकर, दिलीप गांधी, विजय उदापूरकर, शरद मचाले, विनोद कोचर, संजय टक्कामोरे, जेठमल डागा, सुमत लल्ला, पंकज बोहरा, डॉ. कमल पुगलिया, रवींद्र आग्रेकर, हरीश जैन, कमलेश जैन, रिंकू जैन, योगेंद्र शहा, जितेंद्र तोरावत, देवेंद्र आग्रेकर, संजय नेताजी, दीपक शेंडेकर, जिनेंद्र लाला, राजेंद्र जैन, सुरेश आग्रेकर, दिलीप लाखे, हिराचंद मिश्रीकोटकर, उदय जोहरापूरकर, देवेंद्र आग्रेकर, पवन जैन, सनद जैन, पीयूष शाह, रोहित शाह, रवींद्र वोरा, मगन दोशी, सोनू जैन, डॉ. रिचा जैन, छाया जैन, शीला उदापूरकर, कश्मिरी पटवा, संगीता पेंढारी आणि व इतर जैन बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व जैन मंदिर संस्था, महिला मंडळ, महावीर यूथ क्लब, जैन चेतना मंच, नागदा युवक मंडळ, लाडपुरा महिला मंडळ, आदर्श महिला मंडळ, परवारपुरा महिला मंडळाने परिश्रम घेतले.