तोतया सीबीआय अधिकाऱ्याची लुटमार
By Admin | Updated: February 3, 2015 01:04 IST2015-02-03T01:04:01+5:302015-02-03T01:04:01+5:30
सीबीआयचे अधिकारी असल्याची बतावणी करून दोन लुटारूंनी एका निवृत्त मुख्याध्यापकाची सोन्याची अंगठी आणि गोफ हिसकावून पळ काढला. वर्दळीच्या मनीषनगरातील रिलायन्स

तोतया सीबीआय अधिकाऱ्याची लुटमार
निवृत्त मुख्याध्यापकाला लुटले : मनीषनगरातील घटना
नागपूर : सीबीआयचे अधिकारी असल्याची बतावणी करून दोन लुटारूंनी एका निवृत्त मुख्याध्यापकाची सोन्याची अंगठी आणि गोफ हिसकावून पळ काढला. वर्दळीच्या मनीषनगरातील रिलायन्स फ्रेशसमोर आज सकाळी ९.४५ वा. ही घटना घडली.
मूळचे अमरावती जिल्ह्यातील रहिवासी असलेले निवृत्त मुख्याध्यापक शालिग्रामजी कडू (वय ८०) सध्या मनीषनगरात राहतात. नेहमीप्रमाणे आज सकाळी ते फिरायला निघाले. घराकडे परत जाताना रिलायन्स फ्र्रेशसमोर मोटरसायकलवरील दोन तरुणांनी त्यांना रोखले. या भागात संजय नावाचा लुटारू हैदोस घालत असल्यामुळे आम्हाला खास सीपींनी इकडे पाठविले. आम्ही सीबीआयची माणसं आहोत, असे सांगून त्या लुटारूंनी कडू यांच्याशी सलगी साधली. लुटमार सुरू आहे, असा धाक दाखवून तुमच्याजवळचे दागिने रुमालात बांधून ठेवा, असा सल्लाही दिला. त्यावरून कडू यांनी गोफ आणि सोन्याची अंगठी रुमालात ठेवली. कडू यांच्या बोटातील दुसरी एक सोन्याची अंगठी घट्ट बसल्यामुळे बोटातून निघत नव्हती. ते पाहून एक लुटारू ती जबरीने काढण्याचा प्रयत्न करू लागला. त्यामुळे कडू यांना संशय आला. त्यांनी लुटारूंना दूर केले.
ओळखपत्र मागताच पलायन
तुम्ही जबरदस्ती करू नका, ओळखपत्र दाखवा, असे कडू यांनी म्हटले. त्याच क्षणी लुटारूंनी कडू यांच्या हातातील रुमालात ठेवलेला गोफ आणि अंगठी हिसकावून पळ काढला. कडू यांनी आरडाओरड करून बाजूच्यांचे लक्ष वेधले. त्यांना ही घटना सांगितली. त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव प्रशांत कडू प्रियदर्शनीला प्राध्यापक आहेत. त्यांनाही फोनवरून ही माहिती कळविली. प्रा. कडू यांनी सोनेगाव पोलिसांना कळविले. पीएसआय निशा बनसोड यांनी कलम ४२०, १७०, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला. आरोपींचा शोध घेतला जात आहे.
पोलीस चौकीची मागणी
वृद्धाला दिवसाढवळ्या वर्दळीच्या भागात लुटल्यामुळे परिसरात रोष निर्माण झाला आहे. या भागात चेनस्नॅचिंग आणि हाणामारीच्या नेहमीच घटना घडतात. त्यामुळे येथे पोलीस चौकी निर्माण करावी, अशी या भागातील नागरिकांची मागणी आहे. अनेक दिवसांपासून नागरिक त्या मागणीचा पाठपुरावा करीत आहेत. मात्र, वरिष्ठांकडून प्रतिसाद मिळत नसल्यामुळे नागरिक संतप्त झाले आहेत.