तोतया पोलिसांनी दोघींचे दागिने लुटले

By Admin | Updated: July 9, 2014 00:54 IST2014-07-09T00:54:26+5:302014-07-09T00:54:26+5:30

तोतया पोलिसांनी अवघ्या पाऊण तासात सदर आणि लकडगंजमध्ये दोन महिलांना धाक दाखवून त्यांचे सव्वा लाखाचे दागिने लंपास केले.

Looted robbery robbed both of the jewelery | तोतया पोलिसांनी दोघींचे दागिने लुटले

तोतया पोलिसांनी दोघींचे दागिने लुटले

नागपूर : तोतया पोलिसांनी अवघ्या पाऊण तासात सदर आणि लकडगंजमध्ये दोन महिलांना धाक दाखवून त्यांचे सव्वा लाखाचे दागिने लंपास केले.
सदरमधील जैन मंदिर, बुध्दविहाराजवळ राहाणाऱ्या राधामनी बालकृष्ण मिनन (वय ४५) आज सकाळी ८.३० वाजता आपल्या कामावर जात होत्या. कराची गल्लीत दोन आरोपी त्यांच्याजवळ आले. आम्ही पोलीस आहोत. असे अंगावर दागिने घालून जाणे धोकादायक आहे, असे सांगत त्यांनी मिनन यांना मंगळसूत्र काढून पुडीत बांधण्यास सांगितले.
मिनन यांनी मंगळसूत्र गळ्यातून काढून रुमालात बांधत असताना आरोपीने ते ६० हजारांचे मंगळसूत्र हिसकावून पळ काढला.
दुसरी घटना आज सकाळी ९.१५ ला वर्धमाननगरातील सुखसागर अपार्टमेंटसमोर घडली. मायादेवी कन्हैयालाल चूघ (वय ६८) प्रवचन ऐकून घरी जात होत्या. मोटरसायकलवरील दोन आरोपींनी त्यांना थांबवले. ‘आम्ही पोलीस आहोत.
समोर चेकिंग सुरू आहे. अंगावर दागिने घालून जाऊ नका‘, असे सांगत या लुटारूंनी त्यांच्याजवळची अंगठी तसेच कानातील टॉप्स काढायला बाध्य केले. हे दागिने रुमालात बांधत असताना आरोपींनी हातचलाखी करून दागिने लंपास केले. या दोन्ही प्रकरणात अनुक्रमे सदर आणि लकडगंज पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
गेल्या काही दिवसांपासून शहरात तोतया पोलिसांचा हैदोस सुरू असताना पोलीस मात्र मूग गिळून बसल्याचे जाणवत आहेत. वारंवार अशा घटना घडत असून, वृत्तपत्रातून त्याबाबत ठळकपणे वृत्त प्रकाशित होऊनही नागरिकही सतर्कता बाळगत नसल्याचे अनेक प्रकरणातून स्पष्ट होत आहे.
असे लुटारू समोर आल्यास आरडाओरड केली तरी आपल्या किमती चिजवस्तू वाचविल्या जाऊ शकतात, नागरिकांनी तशी सतर्कता दाखवण्याची गरज पोलीस अधिकारी व्यक्त करीत आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Looted robbery robbed both of the jewelery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.