नोटाच्या बंडलाचे आमिष महागात पडले
By Admin | Updated: February 20, 2015 02:06 IST2015-02-20T02:06:28+5:302015-02-20T02:06:28+5:30
नोटाचे पाकीट देतो तुम्ही तुमच्या जवळील दागिने आम्हाला द्या, असे सांगून दोन आरोपींनी एका महिलेचे सात हजार रुपयांचे दागिने पळवून तिची फसवणूक केली.

नोटाच्या बंडलाचे आमिष महागात पडले
नागपूर : नोटाचे पाकीट देतो तुम्ही तुमच्या जवळील दागिने आम्हाला द्या, असे सांगून दोन आरोपींनी एका महिलेचे सात हजार रुपयांचे दागिने पळवून तिची फसवणूक केली. ही घटना कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी दुपारी १ वाजताच्या दरम्यान घडली.
सुजाता अनिल कुळकर्णी (४०) रा. जुनी मंगळवारी तथागत बुद्धविहार गंगाबाई घाट रोड या ३० ते ३२ वयोगटातील दोन अनोळखी आरोपींसोबत बोलता बोलता कल्याणेश्वर मंदिर, झेंडा चौक, भोला गणेश चौक येथे गेल्या. गोष्टीत दोन्ही आरोपींनी या महिलेचा विश्वास संपादन केला. तुमच्या जवळील सोन्याच्या दागिन्यांच्या मोबदल्यात नोटाचे पाकीट देतो, अशी बतावणी त्यांनी या महिलेस केली. आपल्याजवळील दागिने एवढे महागडे नसल्याचे पाहून या महिलेने त्यांचा प्रस्ताव मान्य करून आपल्या अंगावरील सात हजार रुपयांचे दागिने आरोपींना दिले. आरोपींनी त्यांच्याजवळील सिमेंट रंगाचे पाकीट महिलेस देऊन तेथून निघून गेले.
थोड्या वेळानंतर या महिलेने पाकीट उघडून पाहिले असता त्यात ५० रुपयाची नोट आणि इतर कागद दिसले. (प्रतिनिधी)