शासनाच्या कारवाईकडे लक्ष
By Admin | Updated: July 14, 2015 03:26 IST2015-07-14T03:26:14+5:302015-07-14T03:26:14+5:30
उच्च शिक्षण सहसंचालकांनी कारवाईचा इशारा दिल्यानंतर प्राध्यापकांनी महाविद्यालयांमध्ये ६ तास ४० मिनिटे थांबलेच

शासनाच्या कारवाईकडे लक्ष
नागपूर : उच्च शिक्षण सहसंचालकांनी कारवाईचा इशारा दिल्यानंतर प्राध्यापकांनी महाविद्यालयांमध्ये ६ तास ४० मिनिटे थांबलेच पाहिजे, असा मौखिक आदेश काही प्राचार्यांनी काढला आहे. परंतु मौखिक आदेशाला न जुमानण्याची भूमिका प्राध्यापक संघटनांनी घेतली आहे. राज्य शासनाविरोधात प्राध्यापकांची भूमिका कायम असून, या परिस्थितीत सहसंचालकांकडून खरोखरच वेतनकपात करण्यात येते का, याकडे शिक्षण वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
प्राध्यापक फारच कमी वेळ महाविद्यालयांत असल्याच्या बऱ्याच तक्रारी उच्च व तंत्रशिक्षण विभागाला प्राप्त झाल्या होत्या. याची दखल घेऊन प्राध्यापक खरोखरच नियमांचे पालन करतात का, यासाठी विभागाने चाचपणी करण्याचे ठरविले आहे. महाविद्यालयांमध्ये प्राध्यापकांनी वेळेचे नियम पाळणे आवश्यक असून, महाविद्यालयांना ‘बायोमेट्रिक मशीन’ लावणे अनिवार्य करण्यात आले आहे. जर वेळेचे नियम पाळण्यात आले नाही तर, नियमांनुसार पगारकपात करण्याचा इशारा उच्च शिक्षण सहसंचालकांनी दिला आहे. दरम्यान, या धोरणाला प्राध्यापक संघटनांनी जोरदार विरोध करण्यास सुरुवात केली आहे. विविध प्राध्यापक संघटनांनी जाहीरपणे सहसंचालकांचा निषेध केला; शिवाय काही संघटनांनी उच्च स्तरावर संपर्क केला आहे.
प्राचार्यांच्या मौखिक आदेशाचे पालन न करण्याचे प्राध्यापक संघटनांनी सांगितले असल्यामुळे, आता सहसंचालकांकडून कोणत्या प्रकारची कारवाई करण्यात येते, याकडे लक्ष लागले आहे. यासंदर्भात विभागीय सहसंचालक डॉ. अंजली रहाटगावकर यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. (प्रतिनिधी)