शासकीय इमारतींचा लुक बदलणार
By Admin | Updated: April 4, 2017 01:50 IST2017-04-04T01:50:32+5:302017-04-04T01:50:32+5:30
राज्यसरकारने नागपुरातील शासकीय इमारतींच्या बांधकामासाठी १६७.४३ कोटी रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता दिली.

शासकीय इमारतींचा लुक बदलणार
मुख्यमंत्री, पालकमंत्र्यांचा पुढाकार : १६७.४३ कोटी मिळणार
नागपूर : राज्यसरकारने नागपुरातील शासकीय इमारतींच्या बांधकामासाठी १६७.४३ कोटी रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विशेष प्रयत्नांनी हा निधी मंजूर झाला आहे. मुंबईला मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. पाच कोटींपेक्षा अधिक किमतीच्या इमारतींसाठीच्या बांधकामांना मंजुरी देण्यासाठी सचिव समितीची बैठक घेण्यात आली होती. या बैठकीला २१ विभागांचे सचिव उपस्थित होते.
शहरासह जिल्ह्यातील शासकीय इमारती तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि मेयो हॉस्पिटलच्या बांधकामांचा यात समावेश आहे. तसेच काटोल, हिंगणा, कोंढाळी आणि कुही येथे पोलीस अधिकारी, कर्मचारी निवासस्थाने तसेच अजनी येथे शासकीय वैद्यकीय रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांची निवासस्थाने व विधानभवन नागपूर विस्तारित इमारत क्रमांक २ चे नूतनीकरण व दोन मजली इमारत बांधकाम ही कामे या निधीतून केली जाणार आहेत. या निधीसाठी जिल्ह्यातील भाजपाच्या आ. सुधीर पारवे, आ. समीर मेघे, आ. आशिष देशमुख, आ. मल्लिकार्जुन रेड्डी यांनीही पाठपुरावा केला होता. तर शहरातील मेडिकल कॉलेज इमारतींसाठी निधीचा पाठपुरावा आ. सुधाकर देशमुख, आ. सुधाकर कोहळे, आ. कृष्णा खोपडे, आ. विकास कुंभारे यांनी केला होता.(प्रतिनिधी)
या कामांसाठी निधी मंजूर
काटोल येथे पोलिस अधिकारी-कर्मचारी निवासस्थानांसाठी ५८१ लक्ष, हिंगणासाठी ८२३ लक्ष, कोंढाळीसाठी ५४२ लक्ष, कुहीसाठी ८३७ लक्ष रुपये मंजूर केले आहे. तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय राजाबाक्षा धोबीचाळ अजनी येथे डी टाईप तसेच वर्ग ४ च्या निवासस्थानांचे बांधकामासाठी ८४१ लक्ष, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे निवासी डॉक्टरांसाठी २५० क्षमतेचे नवीन वसतिगृह ४३०२ लक्ष आणि इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय येथे प्रशासकीय इमारतीचे बांधकाम ७७६४ लक्ष आणि विधान भवन विस्तारित इमारतीचे नूतनीकरण आणि दोन मजली इमारत बांधकामासाठी १०५४ लक्ष रुपये या बैठकीत मंजूर करण्यात आले आहेत.