आपली बस चेकर्सवर नजर ! तोटा कमी करण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2020 21:13 IST2020-01-04T21:10:48+5:302020-01-04T21:13:46+5:30
आपली बसचा तोटा कमी करण्यासाठी तिकिटांचा गैरव्यवहार रोखणे आवश्यक आहे. यासाठी चेकर्सची नियुक्ती करण्यात आलेली आहे.परंतु चेकर्सलाही धमक्या येतात. याचा महापालिकेच्या उत्पन्नावर परिणाम होत असल्याने चेकर्सवर नजर ठेवली जाणार आहे.

आपली बस चेकर्सवर नजर ! तोटा कमी करण्याचा प्रयत्न
लोकमत न्यूच नेटवर्क
नागपूर : आपली बसचा तोटा कमी करण्यासाठी तिकिटांचा गैरव्यवहार रोखणे आवश्यक आहे. यासाठी चेकर्सची नियुक्ती करण्यात आलेली आहे. परंतु चेकर्सलाही धमक्या येतात. यामुळे तिकीट तपासनीच्या कामात बाधा येते. तसेच अनेकदा हस्तक्षेप केला जातो. याचा महापालिकेच्या उत्पन्नावर परिणाम होत असल्याने चेकर्सवर नजर ठेवली जाणार आहे. यासाठी कर्मचारी नियुक्त करण्यात येणार आहे.
शहरातील नागरिकांना उत्तम दर्जाची सेवा उपलब्ध व्हावी, यासाठी परिवहन सेवा चालविली जाते. यासाठी दर महिन्याला जवळपास सात कोटीचा तोटा होतो. हा तोटा कमी करण्यासाठी तिकिटांचा गैरप्रकार रोखला जावा, यात कंपनीतर्फे नेमण्यात येणाऱ्या चेकर्सची भूमिका महत्त्वाची आहे. त्यामुळे चेकर्सवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी महापालिकेच्या १५ कर्मचाऱ्यांवर दिली जाणार असल्याची माहिती परिवहन समिती सभापती बाल्या बोरकर यांनी शनिवारी दिली.
आपली बस सेवेसाठी नियुक्त डिम्स कंपनीच्या ७० चेकर्ससोबत बोरकर यांनी स्वतंत्र बैठक घेऊ न संवाद साधला. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी समिती सदस्या अर्चना पाठक, मनिषा धावडे, वैशाली रोहणकर, सदस्य नागेश मानकर, परिवहन विभागाचे प्रशासकीय अधिकारी रवींद्र पागे, श्रम अधिकारी अरुण पिपरुडे, वाहतूक व्यवस्थापक सुकीर सोनटक्के, लेखा अधिकारी विनय भारद्वाज, डिम्सचे सूर्यकांत अंबाडेकर, सतीश सदावर्ते आदी उपस्थित होते.
अकस्मात तपासणीत दोषी आढळणाऱ्या चेकर्सना थेट निलंबित करण्यात येणार आहे, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. अनेकदा बसमधील तिकीट तपासणीसाठी चेकर्सनी बस थांबविल्यानंतर त्यांच्यावर तिकीट न तपासण्यासाठी दबाव आणला जातो. दबाव येत असल्यास थेट संपर्क साधा, संबंधितावर त्वरित कारवाई करण्यात येईल, असे बोरकर यांनी सांगितले.
खासगी वाहतूक बंद करा
डिम्स कंपनीला नियमितपणे देयक देण्यात येते. त्यामुळे मनपाचे उत्पन्न वाढविण्याचे दायित्व व नैतिक जबाबदारी ही कंपनी व चेकर्सचे आहे. बस कर्मचाऱ्यांकडूक सुरु असलेले अवैध वॉटस् अॅप ग्रुप तातडीने बंद करण्यासाठी प्रयत्न करावेत. कुठल्याही प्रकारची धमकी अथवा महिला चेकर्स यांना त्रास झाल्यास ते सभापतींशी थेट संपर्क करतील, असे आवाहन केले. खासगी बसमार्फत होणारी शहरातील प्रवासी वाहतूक बंद करण्याचे निर्देश बोरकर यांनी दिले.
अनेक बसेस नादुरस्त
आपली बसच्या धंतोली येथील आगारात कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे. ती तातडीने वाढविण्याचे निर्देश त्यांनी डिम्सच्या अधिकाऱ्यांना दिले. याशिवाय अनेक बसची अवस्था वाईट आहे. काही बसच्या सिट तुटलेल्या, खिडक्यांची काच फुटलेली, दरवाजे तुटलेल्या स्थितीत आहेत. बस तातडीने दुरुस्त करण्याबाबत कारवाई करा, तसेच तिकीट तपासणीवेळी बसची स्थिती व्यवस्थित न आढळल्यास संबंधित चेकर्सनी लगेच त्याचा फोटो कंपनीकडे पाठवावा,धूर सोडणाऱ्या बस आढळल्यास त्या बसचाही फोटो व क्रमांक कंपनीकडे पाठवा, याची दखल न घेतल्यास कारवाईचा इशारा बोरकर यांनी दिला.