लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाच्या नावावर सुटकेसाठी उपोषण करणारे कैदी ३० तासानंतर सरळ झाले. तुरुंग अधिकाऱ्यांनी याचे दूरगामी परिणाम होण्याचा इशारा दिल्यानंतर त्यांनी आपले उपोषण मागे घेतले. यामुळे उपोषणासाठी पुढाकार घेणाऱ्या स्थानिक गुन्हेगारांची योजना अपयशी ठरली.सर्वोच्च न्यायालयाने तुरुंगातील गर्दी कमी करण्यासाठी कैद्यांना पॅरोल किंवा जामिनावर सोडण्याचे आदेश दिले आहेत. राज्य सरकार एक कमिटी गठित करून कैद्यांची सुटका करणार आहे. नागपूरच्या तुरुंगात असलेल्या ५०० पेक्षा अधिक कैद्यांची सुटका होणार आहे. परंतु खून, बलात्कार, अल्पवयीन मुलीशी बलात्कार, आर्थिक घोटाळेबाज यासारख्या गुन्हेगारांना मात्र या आदेशाचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे बहुचर्चित सेवन हिल्स बार हत्याकांडात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या स्थानिक गुन्हेगाराने साथीदाराच्या मदतीने सुटकेसाठी नागपूरच्या मध्यवर्ती तुरुंगात रविवारी सकाळपासून उपोषण सुरू केले होते. त्याने आपल्या बॅरेकमधील सर्व २०० कैद्यांना फूस लावून उपोषणात सहभागी करून घेतले होते. तुरुंग अधिकाऱ्यांनी समजावल्यानंतरही कैदी उपोषणावर अडून होते.लोकमतने सोमवारी या वृत्ताचा खुलासा करताच तुरुंग विभागात खळबळ माजली. वरिष्ठ अधिकारीही सतर्क झाले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तुरुंग प्रशासनावर आधीच मोठा दबाव आहे. त्यांनी आवश्यक खबरदारीही घेतलेली आहे. यानंतरही कैद्यांनी उपोषण केल्याने अधिकारी दुखावले होते. तुरुंग अधीक्षक अनुप कुमार कुमरे यांनी उपोषणावर असलेल्या कैद्यांशी पुन्हा चर्चा केली. त्यांना नियम व सरकारचे दिशानिर्देश काय आहेत, हे समजावून सांगितले. तसेच हे उपोषण आंदोलन त्यांच्याच विरोधात जाऊ शकते, याबाबत सावधही केले. यानंतर सोमवारी दुपारी १२ वाजता सर्व कैदी जेवण करायला तयार झाले.
लोकमत इम्पॅक्ट : अखेर नागपूर मध्यवर्ती तुरुंगातील त्या कैद्यांचे उपोषण मागे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2020 21:16 IST
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाच्या नावावर सुटकेसाठी उपोषण करणारे कैदी ३० तासानंतर सरळ झाले. तुरुंग अधिकाऱ्यांनी याचे दूरगामी परिणाम होण्याचा इशारा दिल्यानंतर त्यांनी आपले उपोषण मागे घेतले.
लोकमत इम्पॅक्ट : अखेर नागपूर मध्यवर्ती तुरुंगातील त्या कैद्यांचे उपोषण मागे
ठळक मुद्देतुरुंग अधीक्षकांशी चर्चेनंतर केले भोजन : स्थानिक गुन्हेगारांची योजना फेल