Lok Sabha Election 2019; व्हीव्हीआयपींच्या सभांनी चढणार विदर्भाचा राजकीय पारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2019 10:40 IST2019-03-30T10:39:03+5:302019-03-30T10:40:19+5:30
लोकसभा निवडणुकांच्या प्रचाराला सर्वच पक्षांकडून सुरुवात झाली असून एप्रिल महिन्याचा पहिला आठवडा हा ‘पॉवरपॅक’ राहणार आहे.

Lok Sabha Election 2019; व्हीव्हीआयपींच्या सभांनी चढणार विदर्भाचा राजकीय पारा
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लोकसभा निवडणुकांच्या प्रचाराला सर्वच पक्षांकडून सुरुवात झाली असून एप्रिल महिन्याचा पहिला आठवडा हा ‘पॉवरपॅक’ राहणार आहे. ‘व्हीव्हीआयपी’ नेत्यांच्या सभांमुळे राजकीय पारा चढणार आहे. वर्धा-गोंदिया येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. याशिवाय विविध पक्षांचे राष्ट्रीय नेतेदेखील शहरात येणार आहेत.
१ एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वर्धा येथून महाराष्ट्रातील प्रचारसभांचा शंखनाद करणार आहेत. ते नागपूरला येतील व येथून वर्धा येथे जातील. यानंतर ४ एप्रिल रोजी गोंदिया येथेदेखील त्यांची सभा होण्याची दाट शक्यता आहे. यासोबत भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या सभेचेदेखील नागपुरात आयोजन होण्याची शक्यता आहे. शहा यांनी सभेसाठी होकार दिला असून नेमकी तारीख निश्चित व्हायची असल्याची माहिती सूत्रांनी दिली. यासंदर्भात नेमका निर्णय दोन दिवसात होईल असे भाजपाचे शहराध्यक्ष आ.सुधाकर कोहळे यांनी सांगितले.
दुसरीकडे कॉंग्रेसतर्फे सरचिटणीस प्रियंका गांधी यांची सभा विदर्भात होण्याची शक्यता आहे. मात्र सभास्थान नागपूर असेल की यवतमाळ याबाबत चर्चा सुरू असून अंतिम निश्चिती व्हायची आहे. बसपाच्या राष्ट्रीय अध्यक्षा मायावती यांची सभा ५ एप्रिल रोजी कस्तूरचंद पार्क येथे होणार आहे. बसपाने समाजवादी पक्षासोबत हातमिळावणी केल्याने नागपुरात मायावतींसमवेत उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव हेदेखील यावे, यासाठी प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी भारिप-बहुजन महासंघाचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर आणि ‘एमआयएम’चे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांची १ एप्रिलला नागपुरात जाहीर सभा होणार आहे.
मुख्यमंत्र्यांच्यादेखील सभांचे आयोजन
दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभांचे ४ एप्रिलपासून आयोजन करण्यात आले आहे. ४ एप्रिल, ७ एप्रिल, ८ एप्रिलला मुख्यमंत्र्यांच्या शहराच्या विविध भागात प्रचार सभा होणार आहेत. या कालावधीत भाजपाचे ‘स्टार प्रचारक’देखील नागपुरात येण्याची शक्यता आहे.