लाव्हा ग्रामपंचायतीला ठोकले कुलूप

By Admin | Updated: April 8, 2017 02:26 IST2017-04-08T02:26:47+5:302017-04-08T02:26:47+5:30

नजीकच्या लाव्हा येथे पाण्याच्या टाकीचे बांधकाम पूर्ण होऊनही जलवाहिनी टाकण्यात न आल्याने ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली.

Locked to Lava Gram Panchayat | लाव्हा ग्रामपंचायतीला ठोकले कुलूप

लाव्हा ग्रामपंचायतीला ठोकले कुलूप

पाण्यासाठी आंदोलन : लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांना कोंडले
वाडी : नजीकच्या लाव्हा येथे पाण्याच्या टाकीचे बांधकाम पूर्ण होऊनही जलवाहिनी टाकण्यात न आल्याने ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली. त्यामुळे ग्रामस्थांनी आंदोलन करताच ही समस्या १५ दिवसांत सोडविण्याचे प्रशासनाच्यावतीने आश्वासन देण्यात आले. हा काळ पूर्ण होऊनही सदर समस्या ‘जैसे थे’च असल्याने संतप्त नागरिकांनी गुरुवारी सकाळी स्थानिक ग्रामपंचायत कार्यालयाला चक्क कुलूप ठोकले. एवढेच नव्हे तर लोकप्रतिनिधींसह अधिकाऱ्यांना कार्यालयातच ओलिस ठेवले. त्यांनी टँकरने पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन देताच नागरिक शांत झाले. त्यातच शुक्रवारपासून गावाला दोन टँकरने पाणीपुरवठा करायला सुरुवात केली आहे.
लाव्हा येथील पाणीसमस्या सोडविण्यासाठी नागरिकांनी सुरुवातीला धरणे आंदोलन केले. त्यावेळी ही समस्या १५ दिवसांत सोडविण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, प्रशासन काहीही हालचाली करीत नसल्याचे लक्षात येताच नागरिकांनी महादेव नगरातील पाण्याच्या टाकीजवळ शनिवारी (दि. २९) पुन्हा आंदोलन केले. त्यावेळी काहींनी पाण्याच्या टाकीवर चढून प्रशासनाचे लक्ष वेधले होते. परिणामी, ही समस्या चार दिवसांत सोडविण्याचे आश्वासन देण्यात आले. नागरिकांनी त्या आश्वासनावर विश्वास ठेवत आंदोलन मागे घेतले.
आठवडा लोटूनही पाणीसमस्या सोडविली जात नसल्याचे लक्षात येताच संतोषीनगर, महादेवनगर, निर्मलनगर, निर्मलउज्वलनगर येथील नागरिक गुरुवारी ग्रामपंचायत कार्यालयात पोहोचले. त्यावेळी नागपूर पंचायत समितीचे उपसभापती सुजित नितनवरे, प्रभारी खंडविकास अधिकारी दिलीप कुहिटे, सरंपच जिजा धुर्वे, उपसरपंच रॉबिन शेलारे व ग्रामविकास अधिकारी विकास लाडे कार्यालयात हजर होते.
संतप्त नागरिकांनी ही मंडळी आत असतानाच कार्यालयाला कुलूप ठोकले. काही वेळाने नागरिकांनी स्वत: कुलूप उघडून आतील लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांशी या समस्येवर चर्चा केली तेव्हा उद्यापासून (शुक्रवार, दि. ७) टँकरने पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन देण्यात आले. परिणामी, शुक्रवारपासून गावात दोन टँकरद्वारे पाणीपुरवठा करायला सुरुवात करण्यात आली.
या आंदोलनात पुरुषोत्तम गोरे, प्रवीण मेश्राम, सचिन पाटील, संदीप गंधारे, भागवत तडोसे, जीवन रुद्रकार, रणजित पांजाण, लता गोरे, वनिता कुंभलकर, सूरज गिरडकर, अंजली चिकने, सुशीला सहानी, दुर्गा बोडखे, गीता गौतम, वर्षा गणवीर, कमला खवसे, रामेश्वर हरणकर, कमला चंदेलकर, शांताबाई खातारकर, सुलभा गणवीर यांच्यासह ग्रामस्थ सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)

Web Title: Locked to Lava Gram Panchayat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.