लॉकडाऊनचा निर्णय चुकीचा, अन्यायकारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:09 IST2021-04-07T04:09:26+5:302021-04-07T04:09:26+5:30

नागपूर : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्याकरिता व्यापाऱ्यांना जबाबदार ठरवून शासनाने लॉकडाऊन लावून ३० एप्रिलपर्यंत बाजारपेठा बंद ...

The lockdown decision was wrong, unjust | लॉकडाऊनचा निर्णय चुकीचा, अन्यायकारक

लॉकडाऊनचा निर्णय चुकीचा, अन्यायकारक

नागपूर : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्याकरिता व्यापाऱ्यांना जबाबदार ठरवून शासनाने लॉकडाऊन लावून ३० एप्रिलपर्यंत बाजारपेठा बंद केल्या आहेत. त्यामुळे व्यापाऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान होणार आहे. लॉकडाऊनने कोरोना रुग्ण कमी होणार नाहीत. त्याकरिता नागरिकांवर कठोर निर्बंध लादावे. लॉकडाऊन आठवड्याचे अखेरचे दोन दिवस लावावे. पुढे गुढीपाडवा आहे. व्यापाऱ्यांच्या आर्थिक नुकसानीला शासन जबाबदार असल्याचा आरोप करीत शासनाने लॉकडाऊन तात्काळ मागे घ्यावे, अशी प्रतिक्रिया व्यापारी संघटनांनी लोकमतशी बोलताना दिली.

शासनाला ७२ तासांची मुदत

लॉकडाऊन मागे घेण्याची विनंती सरकारला केली आहे. कोरोना रुग्ण कमी करण्यासाठी सरसकट लॉकडाऊन हा मार्ग नाही. त्यामुळे व्यापाऱ्यांचे आर्थिक नुकसान होणार आहे. शासनाला लॉकडाऊन मागे घेण्याची ७२ तासांची मुदत दिली आहे. मागे न घेतल्यास आंदोलन करू.

दीपेन अग्रवाल, अध्यक्ष, कॅमिट.

लॉकडाऊनने काय मिळणार

सरसकट लॉकडाऊन लावून सरकारला काय मिळणार आहे. यामुळे व्यवसाय ठप्प होणार आहे. पुढे गुढीपाडवा आहे. विक्रीसाठी दागिन्यांची ऑर्डर दिली आहे. त्यांना पूर्ण पैसे चुकते करायचे आहे. बँकांचे हप्ते भरायचे आहे. ३० एप्रिलपर्यंत दुकाने बंद राहिल्याने नुकसान होणार आहे.

राजेश रोकडे, सचिव, सोना-चांदी ओळ कमिटी.

व्यापाऱ्यांसाठी ‘डेथ वाॅरंट’

लॉकडाऊनचा निर्णय म्हणजे व्यापाऱ्यांसाठी डेथ वाॅरंट आहे. पुढे व्यापाऱ्यांसमोर आत्महत्येशिवाय पर्याय राहणार नाही. गेल्यावर्षी अशीच स्थिती होती. यावर्षी लॉकडाऊन लावून शासन काय साध्य करणार आहे. निर्बंध व्यापाऱ्यांवर नव्हे तर नागरिकांवर लावण्याची गरज आहे.

अश्विन मेहाडिया, अध्यक्ष, नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स.

हॉटेल व्यावसायिकांचे नुकसान

लॉकडाऊनमुळे हॉटेल आणि रेस्टॉरंट मालकांचे अतोनात नुकसान होणार आहे. आता कुठे हा व्यवसाय थोडा फार सुरू झाला होता, पण आता लॉकडाऊनने पूर्णत: बंद होणार आहे. मालकाला उत्पन्न काहीच नाही, पण खर्च तेवढाच आहे. निर्णय चुकीचा आहे.

तेजिंदरसिंग रेणू, अध्यक्ष, रेशिडेन्सियल हॉटेल असोसिएशन.

निर्णयाने अचंबित

राज्य शासनाच्या लॉकडाऊनच्या निर्णयाने अचंबित झालो आहे. आठवड्याच्या अखेरचे दोन दिवस लॉकडाऊन लावण्याचे अपेक्षित होते. शासनाच्या निर्णयाने सर्वच व्यवसाय धुळीस मिळणार आहे. पुढे खर्च कसा चालवायचा, हा प्रश्न व्यापाऱ्यांसमोर आहे.

बी.सी. भरतीया, अध्यक्ष, कॅट.

Web Title: The lockdown decision was wrong, unjust

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.