रेल्वेस्थानकावरील नेसकॅफे स्टॉलला कुलूप ठोकले
By Admin | Updated: July 9, 2015 02:51 IST2015-07-09T02:51:35+5:302015-07-09T02:51:35+5:30
नागपूर रेल्वेस्थानकावर ५ जुलैला ३ प्रवाशांना रक्तबंबाळ होईपर्यंत नेसकॅफे स्टॉलचा व्यवस्थापक आणि त्याच्या कर्मचाऱ्यांनी मारहाण केली होती.

रेल्वेस्थानकावरील नेसकॅफे स्टॉलला कुलूप ठोकले
प्रवाशांना मारहाण प्रकरण : स्टॉलवरील महिला कर्मचाऱ्याचे निलंबन
नागपूर : नागपूर रेल्वेस्थानकावर ५ जुलैला ३ प्रवाशांना रक्तबंबाळ होईपर्यंत नेसकॅफे स्टॉलचा व्यवस्थापक आणि त्याच्या कर्मचाऱ्यांनी मारहाण केली होती. दरम्यान रेल्वे प्रशासनाने या बाबीची गंभीर दखल घेऊन नेसकॅफे स्टॉलला कुलूप ठोकले आहे तर १५ रुपयाची पाण्याची बाटली २० रुपयांना विकणाऱ्या रेल्वे स्टॉलवरील महिला कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करून ही गंभीर बाब उजेडात आणली होती.
नागपूर रेल्वेस्थानकावर रविवारी कुर्ला-हटिया एक्स्प्रेसमधील १५ प्रवासी प्लॅटफार्म क्रमांक सहावर उतरले. त्यांनी नेसकॅफे स्टॉलवर पाण्याच्या बाटलीची किंमत विचारली असता त्यांना ५ रुपये जास्त किंमत सांगण्यात आली.
किंमत अधिक कशी आकारता असे प्रवाशांनी विचारल्यानंतर त्यांना नॅसकॅफेच्या व्यवस्थापकाने उद्धट वागणूक दिली होती. त्यानंतर प्रवाशांनी याच प्लॅटफार्मवरील रेल्वेच्या स्टॉलवर पाण्याच्या बाटलीची किंमत विचारली असता तेथील महिला कर्मचाऱ्याने २० रुपये किमत सांगितली. प्रवासी उपस्टेशन व्यवस्थापकांकडे तक्रार करून रेल्वेस्थानकाच्या बाहेर पडत असताना मुख्य प्रवेशद्वाराजवळ नेसकॅफेचा व्यवस्थापक आणि त्याच्या कर्मचाऱ्यांनी तीन प्रवाशांना रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण केली. याची तक्रार लोहमार्ग पोलीस ठाण्यात करण्यात आली. दरम्यान रेल्वे प्रशासनाने या बाबीची गंभीर दखल घेऊन नेसकॅफेच्या स्टॉलला कुलूप ठोकले असून रेल्वे स्टॉलवरील महिला कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. या महिला कर्मचाऱ्यावर कार्यालयीन कारवाई करण्यात येणार असल्याचे वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक कुश किशोर मिश्रा यांनी सांगितले. (प्रतिनिधी)