कुलगुरुपदासाठी इच्छुकांचे ‘लॉबिंग’
By Admin | Updated: February 13, 2015 02:20 IST2015-02-13T02:20:34+5:302015-02-13T02:20:34+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरुपदासाठी राजकारण तापले आहे. विद्यापीठ वर्तुळातून अनेक जणांनी अर्ज दाखल केला असून ...

कुलगुरुपदासाठी इच्छुकांचे ‘लॉबिंग’
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरुपदासाठी राजकारण तापले आहे. विद्यापीठ वर्तुळातून अनेक जणांनी अर्ज दाखल केला असून कमीतकमी पाच उमेदवारांमध्ये तर आपला क्रमांक लागावा याकरिता इच्छुकांनी जोरदार ‘लॉबिंग’ सुरू केले असल्याची माहिती आहे. दरम्यान, १४ फेब्रुवारी रोजी शोध समितीची मुंबईला बैठक होणार आहे. या बैठकीत अर्जांच्या छाननीसंदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे.
नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरूपदासाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत ६ फेब्रुवारी ही होती. या पदासाठी सुमारे ३० अर्ज आले असल्याची माहिती उच्चपदस्थ सूत्रांनी दिली. यातील सुमारे १० ते १२ अर्ज हे नागपूर विद्यापीठाच्या वर्तुळातील व्यक्तींचेच आहेत. यात विद्यापीठ प्रशासनातील आजी-माजी अधिकारी, प्राधिकरण सदस्य, विभागप्रमुख, महाविद्यालयांचे प्राचार्य इत्यादींचा प्रामुख्याने समावेश आहे.
यातील अनेक सदस्यांनी निरनिराळ््या माध्यमातून ‘लॉबिंग’ सुरू केले आहे. याकरिता काहींच्या तर नवी दिल्ली तसेच मुंबई वाऱ्यादेखील वाढल्या असल्याची माहिती आहे. शिवाय या काळात कुठल्याही प्रकारे स्वत:वर ‘फोकस’ होणार याचे उमेदवारांकडून पुरेपुर प्रयत्न सुरू आहेत. काही उमेदवारांनी मात्र विद्यापीठाच्या विकासासंदर्भात नेमके ‘व्हीजन’ काय असेल याच्या तयारीवर भर दिला आहे. (प्रतिनिधी)
१४ तारखेला शोध समितीची बैठक
दरम्यान, कुलगुरुपदासाठी आलेल्या अर्जांची शोध समितीकडून छाननी कधी होते याकडे लक्ष लागले आहे. १४ फेब्रुवारी रोजी शोध समितीची मुंबई येथे बैठक होणार आहे. या बैठकीचा नेमका ‘अजेंडा’ अद्याप ठरला नसला तरी आलेल्या अर्जांवरच चर्चा होण्याची शक्यता असल्याची माहिती उच्चपदस्थ सूत्रांनी ‘लोकमत’ला दिली. या समितीकडून कुलपती कार्यालयाला पाच नावांची शिफारस करण्यात येईल. कुलपती या पाच उमेदवारांच्या मुलाखती घेतील. त्यामुळे पहिल्या पाचात येण्यासाठी उमेदवारांमध्ये चढाओढ आहे.