मानद वन्यजीव रक्षकासाठी लॉबिंग!

By Admin | Updated: July 15, 2016 03:05 IST2016-07-15T03:05:48+5:302016-07-15T03:05:48+5:30

सध्या वन विभागात मानद वन्यजीव रक्षक पदासाठी चांगलीच स्पर्धा रंगली आहे. यात कुणी वरिष्ठ अधिकाऱ्यांची शिफारस हातात घेऊन मैदानात उतरले आहे,

Lobbying for honorary wildlife conservationists! | मानद वन्यजीव रक्षकासाठी लॉबिंग!

मानद वन्यजीव रक्षकासाठी लॉबिंग!

आजी-माजी मैदानात : वर्षभरापूर्वीच संपला कार्यकाळ
जीवन रामावत नागपूर
सध्या वन विभागात मानद वन्यजीव रक्षक पदासाठी चांगलीच स्पर्धा रंगली आहे. यात कुणी वरिष्ठ अधिकाऱ्यांची शिफारस हातात घेऊन मैदानात उतरले आहे, तर कुणी थेट मुंबई मंत्रालयाचा दरवाजा ठोठावला आहे. त्यामुळे वन विभागातील या मानाच्या पदासाठी जोरदार ‘लॉबिंग’ सुरू झाले असून, यात अनेक आजी-माजी मानद वन्यजीव रक्षकांचा समावेश असल्याची चर्चा आहे.

विशेष म्हणजे, मागील वर्षभरापासून राज्यातील मानद वन्यजीव रक्षकांच्या नियुक्त्या रखडल्या आहेत. त्यामुळे आता लवकरच नवीन नियुक्त्यांवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. राज्य शासनाने मागील २१ मार्च २०१२ रोजी तीन वर्षांसाठी राज्यातील २७ जिल्ह्यांसाठी २८ मानद वन्यजीव रक्षकांची नियुक्ती केली होती. शिवाय पुन्हा ९ आॅक्टोबर २०१२ रोजी उर्वरित १२ जिल्ह्यातील १२ मानद वन्यजीव रक्षकांच्या नियुक्त्या करण्यात आल्या होत्या. विशेष म्हणजे, या सर्व मानद वन्यजीव रक्षकांचा कार्यकाळ हा २१ मार्च २०१५ आणि ९ आॅक्टोबर २०१५ रोजी संपला आहे. मात्र असे असताना मागील वर्षभरापासून राज्यात नवीन मानद वन्यजीव रक्षकांच्या नियुक्त्या झालेल्या नाहीत. माहिती सूत्रानुसार गत सहा महिन्यांपूर्वी नवीन मानद वन्यजीव रक्षकांच्या नियुक्त्यांसाठी हालचाली सुरू झाल्या होत्या. यात राज्य शासनाने सध्याच्या वन्यजीव रक्षकांकडून त्यांनी मागील तीन वर्षांत केलेल्या कार्याचा अहवाल मागितला होता. तसेच नागपूरशेजारच्या पेंच व्याघ्र प्रकल्प येथे राज्यभरातील सर्व मानद वन्यजीव रक्षकांची एक कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत सर्व मानद वन्यजीव रक्षकांनी भाग घेतला होता. तसेच त्यांनी वन विभागासमक्ष आपल्या कामाचे सादरीकरण केले होते. यानंतर त्या सादरीकरणाच्या आधारे प्रत्येकाला गुण देण्यात आले. यात चांगले गुण मिळणाऱ्यांची पुनर्नियुक्ती करून, इतरांना डच्चू दिला जाणार असल्याची चर्चा आहे. त्यानुसार राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक कार्यालयाकडून मंत्रालयाकडे अहवालही गेला असल्याची माहिती आहे. त्यामुळे अनेकांनी आपल्याला डच्चू मिळूनये म्हणून वन विभागातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माध्यमातून जोरदार प्रयत्न चालविले आहे. नागपूर जिल्ह्याचे मानद वन्यजीव रक्षक कुंदन हाते आणि रोहित कारू यांच्या पैकी कुंदन हाते यांची पुनर्नियुक्ती पक्की मानली जात आहे. मात्र त्याचवेळी कारू यांच्या नियुक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. विशेष म्हणजे, कारू यांचा कार्यकाळ हा अनेक घटनांनी विवादित राहिला आहे. त्यांनी मागील तीन वर्षांत वन्यजीवांचे संरक्षण आणि संवर्धनाच्या कामांपेक्षा वन अधिकाऱ्यांना खूश ठेवण्यासाठीच अधिक परिश्रम घेतले असल्याचे बोलले जात आहे.

कोण असतो, मानद वन्यजीव रक्षक
मानद वन्यजीव रक्षक वन विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्याप्रमाणेच एक महत्त्वाचा घटक असतो. मात्र तो वन अधिकरी किंवा वन कर्मचारी नसतो. त्याची राज्य शासनातर्फे तीन वर्षांसाठी नियुक्ती केली जाते. त्यामुळे ‘मानद वन्यजीव रक्षक’ हे वन विभागातील मानाचे पद मानले जाते. मात्र अनेकजण स्वत: वन अधिकारी असल्याच्या तोऱ्यात वावरून या पदाचा दुरुपयोग करीत असल्याची उदाहरणे पुढे आली आहेत. या पदाला कुठे तरी गालबोट लागण्याची भीती निर्माण झाली आहे. हा धोका लक्षात घेता, यावेळी राज्य शासनाला मानद वन्यजीव रक्षकांची नियुक्ती करताना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. तसेच वन विभागातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांचे बोट धरून या स्पर्धेत उभे असलेल्या लोकांपासून विशेष सावध राहावे लागणार आहे.

 

 

Web Title: Lobbying for honorary wildlife conservationists!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.