झोन सभापतीसाठी भाजपमध्ये लॉबिंग
By Admin | Updated: April 25, 2015 02:24 IST2015-04-25T02:24:28+5:302015-04-25T02:24:28+5:30
महापालिकेच्या दहाही झोनच्या सभापतिपदासाठी येत्या ३० एप्रिल रोजी निवडणूक होऊ घातली आहे. महापालिकेत भाजप बहुमतात आहे.

झोन सभापतीसाठी भाजपमध्ये लॉबिंग
नागपूर : महापालिकेच्या दहाही झोनच्या सभापतिपदासाठी येत्या ३० एप्रिल रोजी निवडणूक होऊ घातली आहे. महापालिकेत भाजप बहुमतात आहे. त्यामुळे पक्षातील इच्छुकांनी संधी मिळण्यासाठी लॉबिंग सुरू केले आहे. शिवाय लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीत पक्षासाठी चांगले काम करणाऱ्यांनाही बक्षीस द्यायचे आहे. यामुळे सभापतिपदाची नावे निश्चित करताना भाजपची डोकेदुखी वाढण्याची चिन्हे आहेत.
झोन सभापतीची निवड एक वर्षासाठी केली जाते. सभापतिपद मिळाल्यानंतर या झोन अंतर्गत येणाऱ्या सर्व प्रभागांवर अप्रत्यक्षपणे नियंत्रण मिळविता येते. संबंधित पदावरील व्यक्तीला याचा राजकीय फायदाही होतो. त्यामुळे इतरत्र संधी न मिळालेल्या नगरसेवकांचा झोन सभापतिपदासाठी आग्रह असतो. सध्या सात झोनमध्ये भाजपचे सभापती आहेत. काँग्रेस, बसपा व शिवसेनेचा प्रत्येकी एक सभापती आहे. या वेळीही निवडणुकीत फारशी समीकरणे बदलणार नाहीत, असेच चित्र आहे. काँग्रेसकडे एकाही झोनमध्ये संख्याबळ नाही. मात्र, भाजपला याकडे डोळेझाक करून कुठलीही रिस्क घ्यायची नाही. यामुळे विजय निश्चित असला तरी भाजप सावध पवित्रा घेण्याच्या विचारात आहे.
विषय समित्यांमध्येही फेरबदल
काही विषय समित्यांमध्येही फेरबदल होण्याची शक्यता आहे. आमदार सुधाकर कोहळे यांनी जलप्रदाय समितीचा राजीनामा दिला आहे तर आरोग्य समितीचे सभापती असलेले रमेश सिंगारे हे स्थायी समितीचे अध्यक्ष झाले आहेत. त्यामुळे या दोन्ही समित्यांवर नव्या अध्यक्षाची नियुक्ती केली जाईल. आरोग्य सभापतिपदासाठी लक्ष्मीनगर झोनचे सभापती गोपाल बोहरे यांचे नाव समोर आले आहे. कर व कर निर्धारण समिती, महिला व बाल कल्याण समिती, शिक्षण समिती सभापतीही बदलण्यात येणार आहे. यासाठीही मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. (प्रतिनिधी)