मंत्रिपदासाठी लॉबिंग
By Admin | Updated: October 30, 2014 00:50 IST2014-10-30T00:50:33+5:302014-10-30T00:50:33+5:30
भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस ३१ आॅक्टोबर रोजी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. त्यांच्यासोबत काही मंत्रीही शपथ घेतील. या मंत्रिमंडळात उपराजधानीतून कुणाची वर्णी लागेल,

मंत्रिपदासाठी लॉबिंग
खोपडे, बावनकुळे, देशमुख स्पर्धेत : दलित नेतृत्व म्हणून मानेंचाही विचार
नागपूर : भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस ३१ आॅक्टोबर रोजी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. त्यांच्यासोबत काही मंत्रीही शपथ घेतील. या मंत्रिमंडळात उपराजधानीतून कुणाची वर्णी लागेल, याकडे नागपूरकरांचे लक्ष लागले आहे. कृष्णा खोपडे, चंद्रशेखर बावनकुळे, सुधाकर देशमुख व डॉ. मिलिंद माने यांची नावे स्पर्धेत आहेत.
‘मिनीमम गव्हर्नमेंट, मॅक्झीमम गव्हर्नन्स’, असे सूत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडले आहे. त्यामुळे फडणवीस यांचे मंत्रिमंडळही लहानच असेल, अशी शक्यता आहे. अशातच मुख्यमंत्रिपद नागपूरला मिळाल्याने नागपुरातून मंत्रिमंडळात किती जणांना स्थान मिळेल, हाही एक प्रश्नच आहे. असे असले तरी नागपुरातून किमान दोन जणांची वर्णी लागेल, अशी शक्यता वर्तविली जात आहे. मंत्रिपदे देताना पक्ष अधिक बळकट करण्यासाठी सामाजिक निकषांचा आधार घेतला जाण्याची शक्यता असून, त्यामुळे आमदारांमध्ये मोठी रस्सीखेच होण्याची चिन्हे आहेत.
तेली समाज बऱ्यापैकी भाजपच्या बाजूने झुकला आहे. पूर्व नागपुरातून कृष्णा खोपडे व कामठीतून चंद्रशेखर बावनकुळे हे दोन्ही आमदार विजयी झाले आहेत. विशेष म्हणजे, या दोन्ही नेत्यांच्या जाहीर सभेत ज्येष्ठ नेत्यांनी ‘तुम्ही निवडून आणा, आम्ही लालबत्ती देतो, असे आवाहन मतदारांना केले होते. खोपडेंनी दुसऱ्यांदा विजय नोंदविला, तर बावनकुळे यांनी हॅट्ट्रिक मारली आहे.
या दोन नेत्यांपैकी एकाची मंत्रिपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे. कुणबी समाजातून असलेले सुधाकर देशमुख हे सिनीअर आहेत. दुसऱ्यांदा विजयी झाले आहेत. लोकसभेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे प्रचारप्रमुख तर प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांचे सल्लागार म्हणून त्यांनी जबाबदारी पार पाडली आहे. त्यामुळे मंत्रिपदाची माळ त्यांच्या गळ्यात पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. डॉ. मिलिंद माने हे दलित समाजातील नेतृत्व आहे. नागपूर जिल्ह्यात भाजपला डॉ. माने यांच्या रूपात एक सुशिक्षित व आंबेडकरी चळवळीत पकड असलेला दलित चेहरा मिळाला आहे. भविष्यातील भाजपासमोरची आव्हाने विचारात घेता, डॉ. माने यांची मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. (प्रतिनिधी)