फ्रान्स देणार मेट्रो रेल्वेला कर्ज

By Admin | Updated: December 3, 2015 03:35 IST2015-12-03T03:35:55+5:302015-12-03T03:35:55+5:30

जर्मनीनंतर आता फ्रान्स मेट्रो रेल्वेला कर्ज देण्यास तयार झाला आहे. फ्रान्सची वित्तीय संस्था ‘एएफडी’ मेट्रो रेल्वेला १३० दशलक्ष युरो अर्थात ९०० कोटी रुपये कर्ज देण्याचा करार मे महिन्यात करणार आहे.

Loans to the Metro Railway by France | फ्रान्स देणार मेट्रो रेल्वेला कर्ज

फ्रान्स देणार मेट्रो रेल्वेला कर्ज

९०० कोटींचा मेमध्ये करार : एएफडी चमूतर्फे पाहणी
नागपूर : जर्मनीनंतर आता फ्रान्स मेट्रो रेल्वेला कर्ज देण्यास तयार झाला आहे. फ्रान्सची वित्तीय संस्था ‘एएफडी’ मेट्रो रेल्वेला १३० दशलक्ष युरो अर्थात ९०० कोटी रुपये कर्ज देण्याचा करार मे महिन्यात करणार आहे. ‘एएफडी’च्या तीन सदस्यीय चमूने बुधवारी प्रकल्पाची पाहणी केली. या चमूत ‘एएफडी’च्या प्रकल्प समन्वयक ज्युलिएट ले पेन्नेरर, प्रकल्प व्यवस्थापक प्रिसले दकोनिक आणि अर्नाड डॉफिन यांचा समावेश आहे. पत्रपरिषदेत ज्युलिएट ले पेन्नेरर म्हणाल्या, मे २०१६ मध्ये कर्जासाठी अंतिम करार करण्यात येईल. व्याजदर बाजारभावानुसार राहील.
नागपूर मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक बृजेश दीक्षित म्हणाले, फ्रान्सची चमू दोन दिवसांपासून नागपुरात आहे. जर्मनीही या प्रकल्पासाठी ५०० दशलक्ष युरो अर्थात ३८०० कोटी रुपये कर्ज देणार आहे. जर्मनीची ‘केएफडब्ल्यू बँके’ची चमू आॅक्टोबरमध्ये नागपुरात आली होती. या कर्जाबाबत बँकेच्या व्यवस्थापकीय संचालकांमध्ये चर्चा सुरू आहे. १५ डिसेंबरपर्यंत कर्जाला मंजुरी मिळेल. उर्वरित १३० दशलक्ष युरो कर्जासाठी दोन दिवसांत फ्रान्सच्या एएफडी चमूसोबत सकारात्मक चर्चा झाली आहे. याप्रकारे मेट्रो रेल्वेसाठी एकूण ६३० दशलक्ष युरो कर्जाची गरज पूर्ण होणार आहे. या प्रकल्पात महाराष्ट्र आणि केंद्र सरकारचा वाटा आहे. बजेटमधून मेट्रो रेल्वेला आर्थिक पुरवठा करण्यात येत असून त्याद्वारे प्रकल्पाचे काम सुरू आहे. (प्रतिनिधी)

७७ टक्के जमिनीचे अधिग्रहण
दीक्षित म्हणाले, मेट्रो रेल्वेसाठी ७७ टक्के जमिनीचे अधिग्रहण झाले आहे. उर्वरित प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. काही जमीन रेल्वेकडून तर ३.५ हेक्टर खासगी जमीन घेण्यात येणार आहे. जमीन अधिग्रहणाचे काम लवकरच पूर्ण होणार आहे.
वर्धा रोडवर काम सुरू होणार
दीक्षित म्हणाले, विमानतळ ते सीताबर्डीपर्यंतचे काम लवकरच सुरू होणार आहे. प्राईड हॉटेलसमोरून काम सुरू होईल. यासाठी वाहतूक अन्य मार्गाने वळविण्यात येणार आहे. वाहतूक विभागाला पत्र दिले आहे. मंजुरी मिळताच काम सुरू होईल.

आॅयकॉनिक टॉवरच्या डिझाईनसाठी स्पर्धा
सीताबर्डी, मुंजे चौकात उभारण्यात येणाऱ्या आॅयकॉनिक टॉवरच्या आर्किटेक्चरल डिझाईनसाठी आंतरराष्ट्रीयस्तराच्या आर्किटेक्टस्मध्ये स्पर्धा घेण्यात येत आहे. यात १३ आर्किटेक्टस्चा सहभाग आहे. ते आपले डिझाईन ८ जानेवारीला सादर करतील. यातून सर्वोत्तम डिझाईनची निवड टॉवर उभारणीसाठी केली जाईल. टॉवर तयार झाल्यानंतर येथे येणाऱ्या वाहनांच्या पार्किंगसाठी लगतच्या मैदानाचा ताबा ‘एनएमआरसीएल’ला मिळाला आहे. खापरी आणि न्यू एअरपोर्ट मेट्रो स्टेशनचे काम सुरू आहे. जमिनीवरील कामे, पूल आणि सुरक्षा भिंतीचे तसेच कार शेडचे काम सुरू आहे. डेपोचे डिझाईन करण्यात येत आहे.
वर्षभरात अनेक बदल : ज्युुलिएट
जुलिएट म्हणाल्या, एक वर्षापूर्वी नागपुरात आलो होतो. त्यावेळी मेट्राचे काम नासुप्रकडे होते. तेव्हा ‘एनएमआरसीएल’ कंपनी नव्हती. एका वर्षात अनेक बदल झाले आहेत. कंपनीची चमू ऊर्जेने काम करीत आहे. कामाची गती पाहता प्रकल्प २०१८ पर्यंत पूर्ण होईल. येथील लोक वाहतुकीसाठी आपल्या वाहनांचा उपयोग करतात. त्यांना मेट्रो रेल्वेकडे आकर्षित करावे लागेल. एएफडी बेंगळुरू आणि कोच्ची मेट्रो प्रकल्पाशी जुळली आहे. बेंगळुरूमध्ये भूमिगत रेल्वे धावणार आहे. येथे मातीची समस्या आहे. तुलनात्मकरीत्या नागपुरात एलिव्हेटेड मेट्रोची उभारणी सोपी आहे.

Web Title: Loans to the Metro Railway by France

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.