‘लिव्ह-इन-रिलेशनशिप’मधील महिला पोटगीस अपात्र
By Admin | Updated: March 8, 2015 13:12 IST2015-03-08T02:30:59+5:302015-03-08T13:12:13+5:30
पतीशी घटस्फोट न घेता परपुरुषासोबत ‘लिव्ह-इन-रिलेशनशिप’मध्ये राहणाऱ्या विवाहित महिलेला ‘घरगुती हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायदा-२००५’अंतर्गत पोटगी ...

‘लिव्ह-इन-रिलेशनशिप’मधील महिला पोटगीस अपात्र
राकेश घानोडे नागपूर
पतीशी घटस्फोट न घेता परपुरुषासोबत ‘लिव्ह-इन-रिलेशनशिप’मध्ये राहणाऱ्या विवाहित महिलेला ‘घरगुती हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायदा-२००५’अंतर्गत पोटगी किंवा अन्य कोणतेही लाभ दिले जाऊ शकत नाही, असा खुलासा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणावर निर्णय देताना केला आहे.
या कायद्याचा लाभ मिळण्यासाठी कलम २ (एफ) मधील व्याख्येनुसार घरगुती नाते असणे आवश्यक आहे. यात अन्य मार्गांसह विवाह किंवा विवाह स्वरूपाच्या संबंधातून दोन व्यक्तींनी एकाच घरात राहण्यालाही घरगुती नाते समजण्यात आले आहे. अविवाहित महिलेला ‘लिव्ह-इन-रिलेशनशिप’मध्ये राहिल्यानंतर घरगुती हिंसाचार कायद्यांतर्गत लाभ मिळू शकतात. यासाठी तिला लग्न करण्याची गरज नाही. परंतु ती महिला व संबंधित पुरुष कायद्यानुसार लग्न करण्यास पात्र पाहिजेत. ते लग्नाच्या वयाचे असायला हवेत. समाज पती-पत्नी म्हणून ग्राह्य धरतील अशाप्रकारे त्यांनी सोबत राहायला पाहिजे. परंतु एखादी विवाहित महिला पतीशी घटस्फोट न घेता परपुरुषासोबत राहात असल्यास तिला घरगुती हिंसाचार कायद्यांतर्गत लाभ दिले जाऊ शकत नाही. कायद्यानुसार ती महिला संबंधित पुरुषासोबत विवाह करण्यास अपात्र आहे. अशा प्रकरणातील संबंधाला घरगुती नाते मानता येणार नाही. विवाहित महिला परपुरुषासोबत घरगुती नाते ठेवू शकत नाही. घरगुती हिंसाचार कायदा लागू होण्यासाठी केवळ विवाह झाल्याप्रमाणे ‘लिव्ह-इन-रिलेशनशिप’मध्ये राहणे पुरेसे नाही. संबंधित महिला व पुरुष कायद्यानुसार विवाह करण्यास पात्र असणेही आवश्यक आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे. मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठाच्या युगलपीठाने ‘दुर्गेश युवराज रहांगडाले’ आणि सर्वोच्च न्यायालयाने ‘इंदिरा शर्मा’ प्रकरणात दिलेल्या निर्णयाचे अवलोकन केल्यानंतर कायद्यातील तरतुदींवर हा सखोल उहापोह करण्यात आला आहे.