नागपूर : घरी गणेशोत्सवात गुरुवारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आल्याने तिने कामाचे नियोजन करत 'नाइट शिफ्ट' घेतली. कार्यक्रमाची पूर्ण तयारी करत ती सहकारी महिलेसोबत कामावर पोहोचली. मात्र काहीच वेळात स्फोट झाला अन् डोळ्यासमोर अक्षरशः अंधारी आली. सुन्न पडलेले कान, सगळीकडे धूर अन् किंकाळ्या, आक्रोश या स्थितीत तिने इतर महिलांसोबत सुरक्षित ठिकाणी धाव घेतली अन् तिचा जीव वाचला. केवळ गणरायाची कृपा होती म्हणूनच त्या वाचल्या असे सांगतांना 'सोलार एक्सप्लोसिव्ह' मधील महिलांचे नातेवाईक व खुद्द महिलांना अश्रू अनावर झाले होते.
'लोकमत'ने रविनगरातील दंदे इस्पितळात दाखल असलेल्या जखमी व त्यांच्या नातेवाईकांकडून नेमके तथ्य जाणून घेण्याचा प्रयत्न केला. रूपाली मुळेकर व कल्पना धुर्वे या दोन्ही महिला कामगार गुरुवारी 'नाइट शिफ्ट' मध्ये होत्या. रात्री साडेबारा वाजता मोठ्ठा आवाज झाला अन् त्या काम करत असलेल्या प्लॉन्टपर्यंत स्फोटाची मोठी दाहकता जाणवली.
'क्रिस्टलायझेशन' होत असलेल्या इमारतीपासून त्या चारशे मीटर अंतरावर होत्या. तेथून त्यांनी बाहेर धाव घेतली. मात्र दोघीही खाली पडल्या व जखमी झाल्या. त्यांना तातडीने दंदे इस्पितळात दाखल करण्यात आले. या घटनेनंतर दोघीही मानसिक धक्क्यात आहे. स्फोटाची तीव्रता आठवून वारंवार त्यांच्या डोळ्यात पाणी येत होते. जणू बारूद आमच्याच मागे येत आहे की काय असेच त्या क्षणी वाटत होते. आम्ही वाचू की नाही याचीच शाश्वती नव्हती. केवळ गणरायानेच आमचे रक्षण केले हीच भावना त्या बोलून दाखवत होत्या.
मुलांच्या शिक्षणासाठी हाती घेतले काम
- दोन्ही महिला आमडी या गावातील आहेत. त्यांच्या घरची परिस्थितीत बेताचीच आहे. रूपाली यांचा मुलगा बारावीला व मुलगी दहावीला आहे. त्यांच्या शिक्षणाच्या खर्चाला हातभार लागावा म्हणून मागील दोन ते तीन वर्षापासून त्या 'सोलार 'मध्ये काम करत आहेत.
- तर कल्पना यादेखील मुलांच्या शिक्षणासाठीच काम करत आहेत. रूपाली यांच्या माहेरी महालक्ष्मी होत्या व त्यासाठी त्यांची सुटी झाली होती.
- शिवाय गणेशोत्सवाच्या महाप्रसादासाठी तयारी करायची होती. त्यामुळेच त्या 'नाईट शिफ्ट'मध्ये काम करत होत्या, अशी माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली.