ऐका जनहो धम्मसंदेश बाबासाहेबांचा..
By Admin | Updated: October 9, 2016 02:39 IST2016-10-09T02:39:54+5:302016-10-09T02:39:54+5:30
लोकजागृतीसाठीच्या विविध माध्यमामध्ये पथनाट्याची संकल्पना काळानुरुप लोकप्रिय ठरली आहे.

ऐका जनहो धम्मसंदेश बाबासाहेबांचा..
आंबेडकर विचारधारा विभागाचा स्तुत्य उपक्रम : विद्यार्थ्यांच्या २२ चमू सादर करणार पथनाट्य
नागपूर : लोकजागृतीसाठीच्या विविध माध्यमामध्ये पथनाट्याची संकल्पना काळानुरुप लोकप्रिय ठरली आहे. योजनांबाबत जनजागृती किंवा कोणतेही विचार थेट जनतेपर्यंत पोहचविण्याचे प्रभावी माध्यम म्हणून पथनाट्याचे सादरीकरण केले जाते. हीच संकल्पना पुढे नेत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या डॉ. आंबेडकर विचारधारा विभागातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचारधन दीक्षाभूमीवर येणाऱ्या जनतेपर्यंत पोहचविण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे.
बाबासाहेबांनी दिलेली धम्मदीक्षा ही पीडित, शोषित समाजाच्या जीवनात आमूलाग्र परिवर्तन करणारी क्रांती ठरली. या क्रांतीची आठवण म्हणून धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा सोहळ्याला देश-विदेशातून लाखो अनुयायी दीक्षाभूमीवर गोळा होत असतात. या अनुयायांना पथनाट्याद्वारे काहीतरी संदेश देण्यासाठी डॉ.आंबेडकर विचारधारा विभाग व काही संघटनांनी २०१२ पासून ही संकल्पना सुरू केली आहे. यामध्ये तरुणांचा सहभाग राहिल्यास हे प्रवर्तन अधिक प्रभावी ठरू शकेल या विचाराने आयोजकांनी यामध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सहभागी करून घेतले. विभाग प्रमुख डॉ. प्रदीप आगलावे यांनी, यावर्षी विद्यापीठाशी संलग्नित विविध महाविद्यालयांच्या जवळपास ४०० विद्यार्थ्यांच्या २२ चमू सहभागी होणार असल्याचे सांगितले. प्रत्येक चमूसोबत एक प्राध्यापक समन्वयक म्हणून हजर राहणार आहे. यासाठी विविध कॉलेजमध्ये जाऊन सभा घेतल्या व उपक्रमाची माहिती दिली. या विद्यार्थ्यांनी महिनाभरापासून प्रॅक्टिस केली असून ११ आॅक्टोबर रोजी मुख्य सोहळ्याच्या दिवशी ठिकठिकणी या चमू पथनाट्य सादर करणार आहेत. याअंतर्गत त्यांना ‘दीक्षाभूमीवरून धम्मसंदेश’ असे लिहिलेले टी-शर्ट व कॅपचा ड्रेस कोड देण्यात आला आहे.
दीक्षाभूमीवर येणारे लोक बाबासाहेबांचे विचार ऐकतात मात्र त्यांचे पालन केल्या जात नाही. त्यासाठी विविध विषय घेऊन पथनाट्याद्वारे लोकांचे प्रबोधन केले जाते. व्यसन ही कोणत्याही समाजाला लागलेली दुष्प्रवृत्ती आहे. त्यामुळे दीक्षाभूमीवर येताना गुटखा, तंबाखू किंवा इतर व्यसन करू नये किंवा येथून बाहेर पडल्यानंतरही या व्यसनांना तिलांजली द्यावी असा संदेश मागील वर्षी देण्यात आला होता. यावर्षी शांती व करुणा ही पथनाट्याची थीम असल्याचे डॉ. आगलावे यांनी सांगितले. सध्याच्या काळात देशामध्ये जाती धर्मावरून अस्वस्थ वातावरण निर्माण झाले आहे. दुसरीकडे दहशतवाद फोफावला आहे. अशावेळी बुद्धाच्या शांती व करुणेची गरज असून हाच संदेश पथनाट्याद्वारे देण्यात येणार असल्याचे डॉ. आगलावे यांनी स्पष्ट केले. पंजाबराव वानखेडे, बानाईचे डॉ. सुनील तलवारे, राजेश हाडके, प्रा. केशव पाटील, प्रा. प्रशांत तांबे आदी या उपक्रमात संयोजकाची भूमिका बजावत आहेत. (प्रतिनिधी)
विविध महाविद्यालयांचा सहभाग
डॉ. आंबेडकर विचारधारा विभागासह तिरपुडे कॉलेज, मॉडर्न कॉलेज, साईनाथ कॉलेज, लोककला महाविद्यालय वर्धा, बीपी नॅशनल कॉलेज, मॉरिस कॉलेज, डॉ. आंबेडकर सोशल वर्क कॉलेज, आॅरेंज सिटी कॉलेज, स्वामी विवेकानंद कॉलेज, सामाजिक विकास केंद्र, वानाडोंगरी होस्टेल, संताजी कॉलेज, मोखाडे कॉलेज, बीवायईएस, संयुक्ता जयंती आदींचे विद्यार्थी पथनाट्यात सहभागी होणार आहेत.