दांडियाच्या तालावर थिरकणारे प्रेक्षक...प्रचंड उत्साहाचे वातावरण...त्यात सौंदर्यवती अभिनेत्री प्राची देसाईला पाहण्यासाठी प्रेक्षकांचे कुतुहल ताणलेले...उत्कृष्ट सजविलेला रंगमंच आणि आकर्षक रंगीबेरंगी प्रकाशझोतांनी उजळून जाणारा आसमंत...अत्याधुनिक ध्वनियंत्रणेवर मदहोष करणारे संगीत आणि हवीहवीशी वाटणारी मंद वाऱ्यासह अंगावर झेपावणारी थंडी. सारेच वातावरण उत्सुकता आणि उत्कंठेत बुडालेले. थोड्याच वेळात कार्यक्रमाला प्रारंभ होतो. प्रेक्षकांची लाडकी गायिका ‘ऐका दाजीबा...’ गर्ल वैशाली सामंत ‘हॅलो नागपूर’ अशी साद नागपूरकरांना घालत स्टेजवर ‘एण्ट्री’ करते आणि टाळ्यांच्या कडकडाटात अख्खे चिटणीस पार्क स्टेडियम न्हाऊन निघते. गीत, संगीत, नृत्य आणि आदिमायेचा गजराने उत्साह आणि पावित्र्याने वातावरण भारले जाते. सुप्रसिद्ध गायिका वैशाली सामंत यांच्या गीतांच्या कार्यक्रमाने ही मैफिल सजली. एकापेक्षा एक सरस लोकप्रिय हिंदी-मराठी गीतांचे सादरीकरण करुन वैशालीने उपस्थितांची दाद घेतली. रंगमंचावर आल्यावर वैशालीने रसिकांशी संवाद साधला. याप्रसंगी गीतांच्या माध्यमातून तिने संगीतातील विविध प्रकारची गीते सादर करुन रसिकांना आनंद दिला. तिने आपल्या गायनाचा प्रारंभ ‘चम चम करता है ये नशीला बदन....’ या लोकप्रिय धडकेबाज गीताने केला आणि प्रारंभापासूनच रसिक ताल धरीत कार्यक्रमाचा आनंद घ्यायला लागले. यानंतर प्रसिद्ध गीत ‘ऐका दाजीबा..., तू तू है जहाँ मै हु वहाँ..., आज की रात होना है क्या..., कजरारे कजरारे तेरे कारे कारे नैना..., दमादम मस्त कलंदर...’ आदी गीतांनी तिने समाँ बांधला. प्रेक्षकांची मागणी पूर्ण करीत तिने ‘डिपाडी डिपांग डिचीपाडी डिपांग....’ हे गीत सादर केले आणि तरुणाईने तुफान नृत्य करीत या गीताचा आनंद घेतला. याप्रसंगी स्टेडियममधील युवक-युवती फेर धरून नृत्य करीत असल्याने वातावरणात चैतन्य पसरले. त्यानंतर ‘कोंबडी पळाली...’ हे गीत सादर करून तिने प्रेक्षकांचा निरोप घेण्याचा प्रयत्न केला पण प्रेक्षकांनी तिला अजून गीत सादर करण्याची विनंती केली. प्रेक्षकांची मागणी लक्षात घेत वैशालीने ‘श्रीमंत दामोदरपंत’ चित्रपटातले ‘अशा गोड गोजिरीला मॅचिंग मॅचिंग मॅचिंग नवरा पाहिजे...’ हे गीत सादर केले. थोड्याशा गंमत असणाऱ्या या गीताने प्रेक्षकांच्या चेहऱ्यावरही हास्य पसरले. वैशालीने गायन सुरू करण्यापूर्वी शहरातील सुप्रसिद्ध गायक सारेगमप फेम निरंजन बोबडे यांनी कार्यक्रमाचा प्रारंभ केला. ‘देवा तुझ्या दारी आलो गुणगान गाया...’ हे गणेश वंदन सादर केले. त्यानंतर नागपुरातील गुणी गायिका श्रीनिधी घटाटेने ‘येऊ कशी प्रिया...’ हे गीत तयारीने सादर केले. याप्रसंगी निरंजन, श्रीनिधी आणि विजय चिवंडे यांनी वैशालीला विविध गीतात कोरससाठीही साथ दिली. प्रेक्षकांचे एव्हाना समाधान झाले नव्हते आणि प्रेक्षकांच्या मागणीखातर वैशालीही गीत सादर करायला उत्सुक होती. पण वेळेअभावी गीतांचा हा कार्यक्रम आटोपता घ्यावा लागला. याप्रसंगी वैशाली म्हणाली, लोकमतने इतक्या छान कार्यक्रमात मला बोलाविले, याचा मला आनंद वाटतो. लोकमतच्या सखी मंच सदस्यांमध्ये खूप उत्साह आहे. त्यामुळे त्यांच्यासमोर कार्यक्रम सादर करताना नेहमीच मजा येते. नागपूर म्हणजे ‘बडे दिलवाले लोगों का शहर आहे’ असेही ती म्हणाली. कधी इंग्रजी तर कधी हिंदी आणि काहीवेळा मराठीत संवाद साधून तिने प्रेक्षकांना जिंकले.
‘ऐका दाजीबा..’ गर्ल वैशाली सामंतने जिंक ले
By admin | Updated: December 1, 2014 00:53 IST