लोकमत न्यूज नेटवर्कदेवलापार (नागपूर): शाळेच्या आकाशात गडगडणाऱ्या मेघांनंतर अचानक वीज कोसळली आणि रामटेक तालुक्यातील वहांबा जिल्हा परिषद शाळेत क्षणभरात थरकाप उडवणारा क्षण घडला. शुक्रवारी (दि. १८) विज्ञान प्रयोगशाळेच्या स्लॅबवर वीज कोसल्याने शाळा हादरून गेली. ७० हून अधिक विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारी थोडक्यात बचावले, मात्र इमारतीला खोल तडे गेले आणि विद्युत उपकरणे भस्मसात झाली. मृत्यूने दारात थांबूनही मागे फिरल्याचा अनुभव शाळेने घेतला.
रामटेक तालुक्यातील देवलापार परिसरात दुपारी २.३० वाजताच्या सुमारास जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. त्याचवेळी वांबा येथील जि.प. शाळेच्या विज्ञान प्रयोगशाळेला लागून असलेल्या कडुनिंबाच्या झाडावर व प्रयोग शाळेच्या वरच्या भागावर वीज कोसळली. याच प्रयोगशाळेला लागून इयत्ता सहावीचा वर्ग आहे. या वर्गात त्यावेळी १४ विद्यार्थी उपस्थित होते. विजेच्या प्रचंड कडकडाटामुळे विद्यार्थी घाबरले. संपूर्ण शाळेत भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेच्या वेळी शाळेत एकूण ७० विद्यार्थी आणि शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. विजेचा मोठा झटका बसल्याने शाळेतील सीसीटीव्ही कॅमेरे, संगणक, लॅपटॉप, ११ पंखे, ट्यूब लाइट्स, बल्ब्स आणि संपूर्ण विजेची अंतर्गत यंत्रणा निकामी झाली आहे.
"शाळेत विद्यार्थी असतात. वीज शाळा किंवा परिसरात पडल्यास मोठी दुर्घटना होऊ शकते. यापासून बचाव करण्याकरिता प्रत्येक शाळेत वीजरोधक यंत्र लावणे गरजेचे आहे. जेणेकरून मोठी दुर्घटना टाळता येईल."- रवींद्र कुमरे, माजी सदस्य, पंचायत समिती, रामटेक