नागपूर : आठवडाभराच्या उघडीपीनंतर गुरुवारी पुन्हा नागपूरसह विदर्भात पावसाळी वातावरण तयार झाले आहे.गडचिराेली, चंद्रपूर व भंडारा जिल्ह्यात पावसाने जाेरदार हजेरीही लावली. पुढचा आठवडाभर संपूर्णविदर्भात हलका ते मध्यम पाऊस हाेण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे आठवडाभरापासून छळणाऱ्या उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळेल, अशी शक्यता आहे.
पहिल्या ऑगस्टपासून पावसाने उघडीप घेतली आहे. त्यामुळे सूर्याचा ताप चांगलाच वाढला हाेता व वातावरणात आर्द्रता घटली आहे. त्यामुळे उकाडा भयंकर वाढला असून अंगातून घामाच्या धारा वाहत हाेत्या. गुरुवारीसुद्धा सकाळपासून सूर्याची तीव्रता जाणवत हाेती. आठवडाभरापासून निरभ्र झालेल्या आकाशात दुपारनंतर ढग जमा झाले आणि सायंकाळ हाेता हाेता आकाश ढगांनी व्यापले. सकाळी ७२ टक्क्यावर असलेली आर्द्रता सायंकाळी ९२ टक्क्यापर्यंत वाढली. त्यामुळे तापमानात एका अंशाची घट झाली आहे. शहरातील काही भागात पावसाच्या सरीही बरसल्या. ५ मि.मी. पावसाची नाेंद झाली. त्यामुळे उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला.
दरम्यान गडचिराेली जिल्ह्यात सकाळपासून सक्रिय झालेल्या ढगांमधून जाेरदार सरी बरसल्या. येथे दिवसभरात ६० मि.मी. पाऊस नाेंदविला गेला. भंडारा जिल्ह्यातही दुपारपासून पावसाने चांगली हजेरी लावली. शहरात २३ मि.मी. पावसाची नाेंद झाली. चंद्रपूर जिल्ह्यातही पाऊस सक्रिय झाल्याची स्थिती आहे. येथे १७ मि.मी. पाऊस झाला. इतर जिल्ह्यांना पावसाची प्रतीक्षा लागली आहे. अकाेल्यात तब्बल ३५.८ अंश तापमानाची नाेंद झाली, जी राज्यात सर्वाधिक आहे. इतर शहरात मात्र पारा १ ते २ अंशाने खाली आला. श्रावणसरी झाल्या तर तापमानात घट हाेईल अशी अपेक्षा आहे.
पावसाची सरासरी घटलीदरम्यान आठवडाभराच्या खंडानंतर पावसाच्या सरासरीत माेठी घट झाली आहे. जुलैअखेर नागपूरला पावसाची सरासरी २१ टक्के अधिक हाेती, पण उघडीपीमुळे सरासरी घटून केवळ १ टक्क्यावर आली आहे. भंडारा, गाेंदिया, चंद्रपूरची सरासरीसुद्धा एका टक्क्यावर आली आहे. गुरुवारच्या पावसामुळे गडचिराेलीच्या सरासरीत ११ टक्के वाढ आहे. वर्धा ८ टक्के व यवतमाळला १५ टक्क्याची घट आहे. अमरावती ३२, अकाेला ३० व वाशिम जिल्ह्यात २२ टक्के कमी पाऊस झाला असून त्यांना अद्याप चांगल्या पावसाची प्रतीक्षा आहे.