‘प्रकाश बाबा आमटे’ चित्रपटातून मानवतेचा दीप तेवावा
By Admin | Updated: January 25, 2015 00:53 IST2015-01-25T00:53:08+5:302015-01-25T00:53:08+5:30
‘डॉ. प्रकाश बाबा आमटे’ या चित्रपटाची निर्मिती केली तेव्हा तो लोकांना इतका आवडेल, असे वाटले नव्हते. आता हा सिनेमा आंतराष्ट्रीय स्तरावरही वाखाणल्या जात असून यानिमित्ताने बाबा आमटेंचे

‘प्रकाश बाबा आमटे’ चित्रपटातून मानवतेचा दीप तेवावा
दिग्दर्शक समृद्धी पोरे : ‘डॉ़ प्रकाश बाबा आमटे’ चित्रपटातील कलावंतांचा सत्कार
नागपूर : ‘डॉ. प्रकाश बाबा आमटे’ या चित्रपटाची निर्मिती केली तेव्हा तो लोकांना इतका आवडेल, असे वाटले नव्हते. आता हा सिनेमा आंतराष्ट्रीय स्तरावरही वाखाणल्या जात असून यानिमित्ताने बाबा आमटेंचे कार्य विविध देशातल्या नागरिकांना अनुभवता येत आहे. प्रकाश आमटे यांच्यासारखे व्यक्तिमत्त्वच जगात बदल करू शकते. त्यांनी जे माणूस जोडण्याचे कार्य हातात घेतले त्यातूनच मानवतेचा दीप अखंड तेवत राहावा, असे मत या चित्रपटाच्या दिग्दर्शक समृद्धी पोरे यांनी व्यक्त केले.
गुलमोहर बहुउद्देशीय संस्था आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्यावतीने समृद्धी पोरे यांच्या प्रकट मुलाखतीचा आणि या चित्रपटातील वैदर्भीय कलावंतांच्या सत्कार समारंभाचे आयोजन विदर्भ साहित्य संघाच्या सांस्कृतिक संकुलात करण्यात आले. याप्रसंगी पोरे बोलत होत्या. मुळात या चित्रपटात असणारी सर्वच पात्रे खरी आहेत. त्यामुळेच यात जाणीवपूर्वक कथेत काही बदल करण्यात आला नाही. हेमलकसा येथे राहणाऱ्या सर्व सहकाऱ्यांच्या भरवशावर भाऊंचे कार्य मोठे झाले. स्वत:ची प्रसिद्धी न करता निरपेक्षतेने काम करणारी माणसे येथेच पाहिली. या चित्रपटातून भाऊंचे कार्य समोर आणण्याचे काम करण्यासाठी ईश्वराने माझी निवड केली हीच माझी भूमिका आहे. मी चित्रपटासाठी जाण्यापूर्वी भाऊंकडे आमीर खान प्रॉडक्शनचे लोक गेले होते. पण भाऊंनी सर्व हक्क मला दिले. चित्रपटातून अनेक बाबी दाखविणे शक्य नसल्याने काही राहून गेले आहे. पण तरीही प्रकाश आमटेंना हा चित्रपट आवडला.
यावेळी वैदर्भीय कलावंत विनोद राऊत, पूजा पिंपळकर, मुग्धा देशकर, प्रसाद ढाकूलकर, संजय वलिवकर, योगेश राऊत, अतुल महाले, रवी पाटील, भरतरंगारी, खेमराज भोयर, संतोष चोपडे, शेषराव जिभकाटे, राहुल मेश्राम, संजीव रामटेके यांचा सत्कार करण्यात आला़ डॉ़ गिरीश गांधी यांच्या हस्ते समृद्धी पोरे यांना सन्मानपत्र बहाल करण्यात आले़ यावेळी अ़भा़ मराठी नाट्य परिषदेचे उपाध्यक्ष प्रमोद भुसारी, नागपूर शाखेचे अध्यक्ष प्रफुल्ल फरकसे, डॉ़ नरेश गडेकर, श्रद्धा तेलंग उपस्थित होते़ सत्कार सोहळ्यानंतर श्रीकांत आगलावे यांच्या ज्ञानमंदिर प्लॅटफार्म स्कूल व राम इंगोले यांच्या विमल आश्रम शाळेतील विद्यार्थी, मातृसेवा संघ नर्सिंग स्टाफ व पंचवटी वृद्धाश्रमातील वृद्धांसाठी चित्रपटाचा विशेष खेळ आयोजित करण्यात आला होता़ (प्रतिनिधी)