जगण्याची जिद्द ठेवणारा मृत्युंजय
By Admin | Updated: January 2, 2015 00:53 IST2015-01-02T00:53:01+5:302015-01-02T00:53:01+5:30
आईच्या पोटात असतानाच आईचा मृत्यू झाला. पण ते चिमुकले बाळ मात्र आईच्या पोटातही जिवंत राहिले. आपल्या मातेचा चेहरा पाहण्यासाठी ते आसुसले होते पण पोटातून बाहेर येण्यापूर्वीच आईने प्राण सोडला होता.

जगण्याची जिद्द ठेवणारा मृत्युंजय
डॉ. दंदे फाऊंडेशनने केला गौरव : तिसऱ्या जन्मदिनानिमित्त शुभेच्छा
नागपूर : आईच्या पोटात असतानाच आईचा मृत्यू झाला. पण ते चिमुकले बाळ मात्र आईच्या पोटातही जिवंत राहिले. आपल्या मातेचा चेहरा पाहण्यासाठी ते आसुसले होते पण पोटातून बाहेर येण्यापूर्वीच आईने प्राण सोडला होता. आईचा मृत्यू झाल्यावरही तिच्या मृत शरीरातून डॉ. पिनाक दंदे यांनी प्रयत्नपूर्वक या चिमुकल्याला वाचविले. आईच्या मृत्युनंतर जन्म घेणाऱ्या मृत्युंजयचा तिसरा वाढदिवस गुरुवारी रविनगरातील डॉ. दंदे हॉस्पिटल येथे डॉ. दंदे फाऊंडेशनतर्फे साजरा करण्यात आला. याप्रसंगी उपस्थितांनी मृत्युंजयला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
३१ डिसेंबर २०११ व १ जानेवारी २०१२ च्या मध्यरात्री जन्म घेणाऱ्या या बालकाचा वाढदिवस डॉ. दंदे फाऊंडेशनने आज साजरा केला. त्याला आरोग्य सुविधा व आर्थिक साहाय्य पुरविण्याची जबाबदारी डॉ. पिनाक दंदे यांनी स्वीकारली आहे. ३१ डिसेंबर २०११ च्या मध्यरात्री सारिका राजेश मोगरे या महिलेचा मृत्यू झाला. मध्यरात्री डॉ. दंदे हॉस्पिटलमध्ये आणल्यावर तपासणी केली असता डॉ. पिनाक दंदे व स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. सीमा दंदे यांना तिचा मृत्यू झाल्याचे आढळून आले. परंतु डॉ. सीमा दंदे यांना तिच्या पोटात हालचाल जाणवली. तपासले असता पोटात ३८ आठवडे पूर्ण झालेले बाळ आढळून आले. अत्यंत अशक्यप्राय व दुर्मिळातील दुर्मिळ अशी ही घटना होती. डॉ. दंदे दाम्प्त्याच्या नेतृत्वात पोस्टमार्टम सिझेरियन अर्थात मृत्यूपश्चात शस्त्रक्रिया करण्याचा तातडीचा निर्णय घेतला गेला. नातेवाईकांच्या संमतीनंतर मृत्यूपश्चात शस्त्रक्रिया करण्यात आली व बालकाने जन्म घेतला. बालरोगतज्ज्ञ डॉ. मिलिंद मंडलिक यांनी तत्काळ बाळाची तपासणी केली. प्राथमिक उपचार केले. त्यानंतर विविध अडचणींवर मात करून तो बालक आज मृत्यूच्या दारातून बाहेर आला.
दंदे हॉस्पिटल चमूने पेललेल्या आव्हानामुळे तो बालक सुखरूप राहिला. ही घटना घडली तेव्हा ती जागतिक स्तरावर दुर्मिळ घटना म्हणून चर्चेत आली होती. या बालकाला आज तीन वर्षे झाली आहेत. डॉ. दंदे हॉस्पिटलने तेव्हापासूनच त्याच्या आरोग्याची जबाबदारी सांभाळली होती. त्याचा वाढदिवसही साजरा करण्याचे ठरविले होते. परंतु, त्या बालकाचे दुर्दैवाचे फेरे संपले नव्हते. त्यानंतर दुसऱ्या वर्षी त्याच्या वडिलांचाही मृत्यू झाला. मृत्युंजयचे नाव आता अध्ययन मोगरे ठेवण्यात आले आहे.
याप्रसंगी डॉ. पिनाक दंदे, अध्ययनचे आजी-आजोबा, नातेवाईक, रुग्णालयातील कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते आदी उपस्थित होते. अध्ययनचे आजोबा कल्लू मोगरे यांना फाऊंडेशनतर्फे ५ हजार रुपयांची मदत करण्यात आली. हे आर्थिक साहाय्य त्यांना दरवर्षी देण्यात येणार आहे. फाऊंडेशनतर्फे आता अध्ययनला शाळेत टाकण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)