तरुणाला पेट्रोलने जिवंत जाळणाऱ्या तीन भावंडांना जन्मठेप
By Admin | Updated: November 22, 2014 02:30 IST2014-11-22T02:30:41+5:302014-11-22T02:30:41+5:30
नंदनवन झोपडपट्टीत एका तरुणाला पेट्रोलने जिवंत जाळून त्याचा खून केल्याप्रकरणी प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश के. के. सोनवणे यांच्या न्यायालयाने

तरुणाला पेट्रोलने जिवंत जाळणाऱ्या तीन भावंडांना जन्मठेप
नागपूर : नंदनवन झोपडपट्टीत एका तरुणाला पेट्रोलने जिवंत जाळून त्याचा खून केल्याप्रकरणी प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश के. के. सोनवणे यांच्या न्यायालयाने तीन आरोपी भावंडांना शुक्रवारी जन्मठेप आणि प्रत्येकी पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
विनोद ऊर्फ गोपी बाबूराव उमरेडकर (२६), धर्मेंद्र ऊर्फ धम्मा बाबूराव उमरेडकर (२९) आणि हरिश्चंद्र बाबूराव उमरेडकर (३४) सर्व रा. नंदनवन झोपडपट्टी, अशी आरोपींची नावे आहेत.
चौथा आरोपी बाबूराव तुकाराम उमरेडकर (७७) याची सबळ पुराव्याअभावी संशयाचा लाभ देऊन निर्दोष सुटका करण्यात आली आहे. मिथुन जगदीश राऊत (२०), असे मृताचे नाव होते. तो बगडगंज येथील रहिवासी होता. प्रकरण असे की, आरोपी हे कबाडीचा व्यवसाय करायचे. अपंग विनोद याने मिथुनला दीड हजार रुपये उसने दिले होते. वारंवार मागणी करूनही तो पैसे परत करीत नव्हता. २२ फेब्रुवारी २०१२ रोजी मिथून हा नंदनवन झोपडपट्टी येथे आपल्या भाच्याच्या नामकरणाच्या कार्यक्रमात आला होता. विनोदने त्याला गाठून पैशाची मागणी केली होती. परंतु तेथे मिथुनने आपले भरपूर नातेवाईक आहेत, आपण बाहेर जाऊन बोलू असे म्हटले होते. लागलीच विनोदने त्याला आपल्या तीन चाकी स्कूटीवर बसवून कबाडीच्या दुकानासमोर आणले होते. त्यावेळी रात्रीचे ९.४५ वाजले होते. विनोदने पुन्हा पैशाची मागणी करताच सध्या आपणाकडे पैसे नाहीत, असे मिथुनने म्हटले होते. त्याचवेळी तेथे विनोदचे दोन्ही भाऊ आणि वडील आले होते. दरम्यान विनोदने आपल्या तीन चाकी वाहनाच्या डिक्कीतून पेट्रोलची बाटली काढून मिथुनच्या अंगावर ओतली होती. त्याचवेळी धम्माने आगकाडी उगाळली होती. हरिश्चंद्र आणि बाबूराव उमरेडकर यांनी मिथुनला जाळण्यासाठी चिथावणी दिली. मिथुनला जिवंत पेटवून देण्यात आले. त्याचे दोन्ही हात, छाती, चेहरा आणि पोट जळाले होते. तो ४५ टक्के जळाला होता. त्याला मेडिकल कॉलेज इस्पितळात दाखल करण्यात आले होते. मृत्यूपूर्व बयान नोंदवण्यात आल्यानंतर १६ मार्च २०१२ रोजी मिथुनचा मृत्यू झाला होता. तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील जयस्वाल यांनी तपास करून आरोपींविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. न्यायालयात एकूण १४ साक्षीदार तपासण्यात आले. मृत्यूपूर्व बयान आणि प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांनी दिलेल्या साक्षीमुळे गुन्हा सिद्ध होऊन ही शिक्षा सुनावण्यात आली. न्यायालयात सरकारच्यावतीने अतिरिक्त सरकारी वकील राजेंद्र मेंढे, प्रभाकर भुरे यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)