तिघांना जन्मठेप
By Admin | Updated: June 19, 2016 02:47 IST2016-06-19T02:47:53+5:302016-06-19T02:47:53+5:30
धंतोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अजनी चौक येथे साडेतीन वर्षांपूर्वी एका तडीपार गुन्हेगाराचा निर्घृण खून करून त्याच्या भावाचा खुनाचा प्रयत्न करण्यात आला होता.

तिघांना जन्मठेप
अजनी चौक येथील खून : मृत होता तडीपार
नागपूर : धंतोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अजनी चौक येथे साडेतीन वर्षांपूर्वी एका तडीपार गुन्हेगाराचा निर्घृण खून करून त्याच्या भावाचा खुनाचा प्रयत्न करण्यात आला होता. या खटल्याचा शनिवारी अतिरिक्त सत्र न्यायाधीश शेखर मुनघाटे यांच्या न्यायालयाने निकाल जाहीर करून, तीन आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
संजय ऊर्फ बांड्या मधुकर वाघाडे (४३) रा. अजनी चुनाभट्टी, उमाशंकर ऊर्फ राकेश प्रल्हाद पाली (३०) रा. पार्वतीनगर आणि रितेश ऊर्फ विक्की जयसिंग चंदेल (२२) रा. विजयानंद सोसायटी नरेंद्रनगर, अशी आरोपींची नावे असून हे सर्व कुख्यात गुन्हेगार आहेत.
आशिष ऊर्फ बाबू रामाजी बुधबावरे (२३) रा. चुनाभट्टी, असे मृताचे नाव होते, तर अमित ऊर्फ पप्पू रामाजी बुधबावरे (३३) या खटल्यातील जखमीचे नाव आहे.
खटल्याची पार्श्वभूमी अशी, मृत आशिष बुधबावरे हा गुन्हेगार होता. त्याला इमामवाडा पोलीस ठाण्याने तडीपार केले होते; तरीही तो अधूनमधून आपल्या चुनाभट्टी येथील घरी येत होता. २८ फेब्रुवारी २०१३ रोजी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास घरी जाऊन आपला मोठा भाऊ अमित ऊर्फ पप्पू याला कैकाडीनगर येथील दारूभट्टीवर राकेश पाली, संजय वाघाडे आणि विक्की चंदेल यांनी किरकोळ कारणावरून मारहाण केल्याचे सांगितले होते. काही वेळानंतर त्याला मोबाईलवर कोणाचा तरी फोन आला होता. लागलीच त्याने आपल्या भावाला संजय वाघाडे आणि त्याचे साथीदार कैकाडीनगर येथे दारूच्या गुत्त्यावर असल्याचे सांगितले होते. लागलीच अमितने आशिषला मोटरसायकलवर बसवून मारहाणीचा जाब विचारण्यासाठी कैकाडीनगर येथे नेले होते. त्यावेळी रात्रीचे ११.४५ वाजले होते. दारूच्या गुत्त्यावर तिघेही उभे होते. अमितने मारहाणीबाबत चौकशी करताच वाघाडे याने कंबरेतील चाकू काढून अमितच्या पार्श्वभागावर वार केला होता. अमितने आशिषला पळून जाण्यास सांगितले होते. आशिष अजनी चौकाकडे पळून जात असतानाच, तिघांनीही त्याचा पाठलाग करून त्याला पकडले होते. गळ्यावर, छातीवर चाकू आणि कट्यारने १४ घाव करून त्याचा निर्घृण खून केला होता. त्यानंतर सर्व आरोपी पसार झाले होते. अमितही कसाबसा पळत आपल्या रक्तबंबाळ भावाजवळ आला होता आणि बेशुद्ध होऊन पडला होता.
अमितने रक्ताच्या थारोळ्यातील आपला भाऊ अशिष याला पाहून आरडाओरड करताच मोहल्ल्यातील लोक घटनास्थळी धावून आले होते. लागलीच पापा यादव नावाच्या एका इसमाने दोघांनाही आपल्या मारुती कारमधून मेडिकल कॉलेज इस्पितळात नेले होते. परंतु आशिष हा मरण पावला होता. घटनेची सूचना मिळताच १ मार्च २०१३ च्या रात्री १२.३० वाजताच्या सुमारास पोलीस ताफा घटनास्थळी दाखल झाला होता.
धंतोली पोलिसांनी अमित बुधबावरे याच्या तक्रारीवरून भादंविच्या ३०२, ३०७, ३४ कलमान्वये गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली होती. पोलीस निरीक्षक अनिल शेवाळे यांनी तपास करून न्यायालयात आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते.
न्यायालयात २१ साक्षीदार तपासण्यात आले. गुन्हा सिद्ध होऊन तिन्ही आरोपींना भादंविच्या ३०२ कलमांतर्गत जन्मठेप, प्रत्येकी १ हजार रुपये दंड, भादंविच्या ३०७ कलमांतर्गत ७ वर्षे सश्रम कारावास, प्रत्येकी ५०० रुपये दंड, अशी शिक्षा सुनावण्यात आली. या सर्व शिक्षा आरोपींना एकत्र भोगाव्या लागतील. न्यायालयात सरकारच्यावतीने अतिरिक्त सरकारी वकील दीपक कोल्हे, प्रशांत साखरे, फिर्यादीच्यावतीने अॅड. अजय मदने, आरोपीच्या वतीने अॅड. चंद्रशेखर जलतारे, अॅड. अशोक भांगडे आणि अॅड. राम मासुरके यांनी काम पाहिले. हेड कॉन्स्टेबल संजय प्रधान आणि रमेश वानखेडे यांनी न्यायालयीन कामात सहकार्य केले. (प्रतिनिधी)