पाच आरोपींना जन्मठेप
By Admin | Updated: January 8, 2017 02:08 IST2017-01-08T02:08:02+5:302017-01-08T02:08:02+5:30
जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत इंदिरानगर येथे तीन वर्षांपूर्वी मकरसंक्रांतीच्या दिवशी झालेल्या

पाच आरोपींना जन्मठेप
सत्र न्यायालय : पप्पू काळे खूनप्रकरण
नागपूर : जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत इंदिरानगर येथे तीन वर्षांपूर्वी मकरसंक्रांतीच्या दिवशी झालेल्या एका तरुणाच्या खूनप्रकरणी शनिवारी पहिले तदर्थ न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. व्ही. दीक्षित यांच्या न्यायालयाने पाच आरोपींना जन्मठेप आणि प्रत्येकी ३५०० रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दोन आरोपींची निर्दोष सुटका करण्यात आली.
दंडाची एकूण रक्कम १७ हजार ५०० रुपये मृत तरुणाच्या आईला नुकसानभरपाई म्हणून देण्याचा आदेश न्यायालयाने दिला.
संदेश ऊर्फ गोलू वेणू नाईक रा. हुडको कॉलनी, कामेश रवींद्र जांभुळकर रा. कौशल्यानगर अजनी, अकाश ऊर्फ बिट्टू जयकुमार सरोजकर , कुणाल भारत गोस्वामी आणि शेखर प्रकाश आंबुलकर तिन्ही रा. इंदिरानगर, अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत. तर राजेश हरितस्वामी अॅन्थोनी रा. मार्टीननगर आणि शैलेश विजय मुखर्जी रा. कौशल्यानगर अजनी, अशी निर्दोष सुटका झालेल्या आरोपींची नावे आहेत.
रूपेश ऊर्फ पप्पू जनार्दन काळे (२५), असे मृताचे नाव होते. तो हुडको कॉलनी येथील रहिवासी होता. खुनाची घटना १४ जानेवारी २०१४ रोजी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास इंदिरानगर भागात प्रवीण बोभाटे याच्या घराजवळ घडली होती.
वस्तीत जास्त रंगदारी करतो आणि जुने भांडण यावरून आरोपींनी तलवार, चाकू, दगड आणि लाथाबुक्क्यांनी पप्पूवर हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले होते. मेयो इस्पितळात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला होता. अविनय धनराज गणवीर रा. नागार्जुन कॉलनी याच्या तक्रारीवरून जरीपटका पोलिसांनी भादंविच्या ३०२, १४३, १४७, १४८ कलमान्वये गुन्हा दाखल करून २० जानेवारी २०१४ रोजी सर्व आरोपींना अटक केली होती. पोलीस उपनिरीक्षक एस. जे. नाईक यांनी तपास करून आरोपींविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते.
न्यायालयात एकूण १५ साक्षीदार तपासण्यात आले. गुन्हा सिद्ध होऊन पाच आरोपींना भादंविच्या ३०२, १४९ कलमांतर्गत जन्मठेप, प्रत्येकी २ हजार रुपये दंड, भादंविच्या १४३, १४७ आणि १४८ या प्रत्येक गुन्ह्यासाठी ३ महिने कारावास, प्रत्येकी ५०० रुपये दंड, अशी शिक्षा सुनावली. न्यायालयात सरकारच्या वतीने सहायक सरकारी वकील वसंत नरसापूरकर, अॅड. सूरज गुप्ता यांनी काम पाहिले.
हेड कॉन्स्टेबल नामदेव पडोळे यांनी न्यायालयीन कामात सहकार्य केले.(प्रतिनिधी)