शेतमजुराच्या खून प्रकरणात आरोपीला जन्मठेप
By Admin | Updated: November 20, 2015 03:19 IST2015-11-20T03:19:30+5:302015-11-20T03:19:30+5:30
जादूटोण्याच्या संशयावरून एका शेतमजुरावर कुऱ्हाडीचे घाव घालून निर्घृणपणे खून करणाऱ्या एका आरोपीला अतिरिक्त सत्र न्यायाधीश अशोक धामेचा

शेतमजुराच्या खून प्रकरणात आरोपीला जन्मठेप
सायगाव येथील घटना : शेतमजुरावर घातले होते कुऱ्हाडीचे घाव
नागपूर : जादूटोण्याच्या संशयावरून एका शेतमजुरावर कुऱ्हाडीचे घाव घालून निर्घृणपणे खून करणाऱ्या एका आरोपीला अतिरिक्त सत्र न्यायाधीश अशोक धामेचा यांच्या न्यायालयाने जन्मठेप आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
ही थरारक घटना २१ आॅगस्ट २०१४ रोजी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास भिवापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सायगाव या गावात घडली होती. सचिन श्रीपत लोखंडे (३०), असे आरोपीचे नाव आहे. कैलास रामाजी पाटील (५५), असे मृताचे नाव होते.
खटल्याची पार्श्वभूमी अशी, आरोपी सचिन लोखंडे याच्या आईची प्रकृती सतत बिघडत असल्याने सचिन हा कैलास पाटील या शेतमजुरावर जादूटोण्याचा संशय घेत होता. याच कारणावरून घटनेच्या एक वर्षापूर्वी त्याने कैलाससोबत भांडणही केले होते.
कैलास पाटील आणि त्याची पत्नी शोभा पाटील यांची दोन मुले पाच-सहा वर्षांपासून बाहेरगावी राहत असल्याने पती-पत्नी मिळेल त्याच्या शेतावर काम करून आपला प्रपंच चालवीत होते. त्यांचा एक मुलगा अमित हा नागपुरात तर प्रीतम हा नाशिकला राहत होता. गेल्या चार-पाच दिवसांपासून पती-पत्नी कवडू राऊतच्या शेतावर काम करीत होते. घटनेच्या दिवशी शोभाने सकाळी ९ वाजताच स्वयंपाक केला होता. आपल्या पतीला तिने शिदोरी आणि डबकीभर पाणी दिले होते. सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास कैलास पाटील हा कामासाठी शेतावर जाण्यास निघाला होता. त्याच्या मागेच शोभा होती.
घरापासून अंदाजे ५० फूट अंतरावरील बोअरवेलजवळून कैलास जात असतानाच कुऱ्हाड घेऊन आलेल्या सचिन लोखंडे याने कैलासच्या डोक्यावर कुऱ्हाडीचे घाव घालणे सुरू केले होते. शोभा ही पतीच्या बचावासाठी धावली असता सचिनने तिच्यावरही कुऱ्हाड उगारली होती. भयावह दृश्य पाहून शोभा ही या घटनेची माहिती देण्यासाठी धावत पोलीस पाटील वासुदेव मानकर यांच्या घरी गेली होती.
कैलासला रक्ताच्या थारोळ्यात लोळवल्यानंतर सचिन हा रक्ताने माखलेल्या कुऱ्हाडीसह प्रमोद गेडाम याच्या घरी निघून गेला होता. या घटनेबाबत समजताच भिवापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला होता. शोभा पाटील हिच्या तक्रारीवरून पोलिसांनी भादंविच्या ३०२, जादूटोणा प्रतिबंधक कायद्याच्या ३ (२) कलमान्वये गुन्हा दाखल करून सचिन लोखंडे याला अटक केली होती.
पोलीस निरीक्षक मनीष दिवटे यांनी तपास करून आरोपीविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. (प्रतिनिधी)
दंडाच्या रकमेतील ४ हजार रुपये मृताच्या कुटुंबास देण्याचा आदेश
न्यायालयात एकूण ११ साक्षीदार तपासण्यात आले. न्यायालयाने सबळ साक्षीपुराव्याच्या आधारावर आरोपी सचिन लोखंडे याला जन्मठेप आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंडाच्या रकमेपैकी ४ हजार रुपये नुकसान भरपाई म्हणून मृत कैलास पाटील याच्या कुटुंबाला देण्याचा आदेश न्यायालयाने दिला. न्यायालयात सरकारच्यावतीने अतिरिक्त सरकारी वकील संदीप डोंगरे यांनी तर आरोपीच्यावतीने अॅड. आर. आर. राजकारणे यांनी काम पाहिले. सहायक पोलीस निरीक्षक ए. एस. तवाडे, सहायक फौजदार दिलीप कडू, अरुण भुरे यांनी न्यायालयीन कामात सहकार्य केले.