खंडणीसाठी अपहरण करणाऱ्याला जन्मठेप
By Admin | Updated: April 6, 2017 02:24 IST2017-04-06T02:24:04+5:302017-04-06T02:24:04+5:30
दीड लाख रुपये खंडणीसाठी दोन तरुणांचे अपहरण करणाऱ्या आरोपीला सत्र न्यायालयाने बुधवारी जन्मठेपेची कमाल शिक्षा सुनावली.

खंडणीसाठी अपहरण करणाऱ्याला जन्मठेप
सत्र न्यायालय : विविध कलमांतर्गत गुन्हा सिद्ध
नागपूर : दीड लाख रुपये खंडणीसाठी दोन तरुणांचे अपहरण करणाऱ्या आरोपीला सत्र न्यायालयाने बुधवारी जन्मठेपेची कमाल शिक्षा सुनावली. सत्र न्यायाधीश एस. एस. दास यांनी हा निर्णय दिला. ही घटना नंदनवन पोलिसांच्या हद्दीत घडली होती.
ललित विलास ठाकरे (२४) असे आरोपीचे नाव असून तो विश्वकर्मानगर येथील रहिवासी आहे. आरोपीला भादंविच्या कलम ३६४(अ) अंतर्गत जन्मठेप व ५००० रुपये दंड आणि दंड न भरल्यास ५ महिने कारावास, कलम ३८४ अंतर्गत २ वर्षे सश्रम कारावास व ३००० रुपये दंड आणि दंड न भरल्यास ३ महिने कारावास, कलम ३२७ अंतर्गत १ वर्ष सश्रम कारावास व १००० रुपये दंड आणि दंड न भरल्यास १ महिना साधा कारावास तर, कलम ३४२ अंतर्गत ६ महिने साधा कारावास व ५०० रुपये दंड आणि दंड न भरल्यास १५ दिवस कारावास अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे.
सम्यक अनिरुद्ध बनकर (१७) असे फिर्यादीचे नाव असून तो मीरे ले-आऊट, भांडे प्लॉट येथील रहिवासी आहे. ५ सप्टेंबर २०१२ रोजी रात्री ९ च्या सुमारास आरोपीने बनकर व त्याच्या मित्राचे १ लाख ५० हजार रुपये खंडणीसाठी अपहरण करून त्यांना जुना सक्करदऱ्यातील संतोषी मातानगरस्थित खोलीत डांबून ठेवले होते. तसेच, त्यांना जबर मारहाण करून ठार मारण्याची धमकी दिली होती. शासनातर्फे अतिरिक्त अभियोक्ता माधुरी मोटघरे यांनी बाजू मांडली.(प्रतिनिधी)