आयुष्याची सायंकाळ वेदनादायी...
By Admin | Updated: May 22, 2016 02:46 IST2016-05-22T02:46:01+5:302016-05-22T02:46:01+5:30
ज्यांच्यासाठी आयुष्य खर्ची घातले त्या मुलांनी आपल्या जन्मदात्यांना वाऱ्यावर सोडले आहे.

आयुष्याची सायंकाळ वेदनादायी...
‘त्यांना’ आमचा हक्क द्यायला सांगा : जन्मदात्यांची आर्त विनवणी
नागपूर : ज्यांच्यासाठी आयुष्य खर्ची घातले त्या मुलांनी आपल्या जन्मदात्यांना वाऱ्यावर सोडले आहे. ज्यांनी दुनिया दाखवली, त्यांचे होत असलेले हाल बघायला ते तयार नाहीत. त्यामुळे आयुष्याचा अखेरचा टप्पा अनेक जन्मदात्यांसाठी कमालीचा वेदनादायी ठरला आहे. अस्वस्थ करणारे हे वास्तव शुक्रवारी सायंकाळी पाचपावलीत ज्येष्ठांच्या एका बैठकीतून पुढे आले.
बैठकीत जमलेल्या अनेक ज्येष्ठांनी पोलीस अधिकाऱ्यांसमोर आपली व्यथा मांडली. ‘ते (मुले) आम्हाला किमान जगण्यासाठीही पैसे देत नाहीत, अशा तक्रारी केल्या आणि त्यांना ठाण्यात बोलवून आमचा हक्क द्यायला सांगा’, अशी विनंतीही केली.
पाचपावली पोलीस ठाण्यात शुक्रवारी ज्येष्ठ नागरिकांची बैठक घेण्यात आली. त्यात त्यांच्या अडीअडचणी, समस्या ऐकून घेण्याची औपचारिकता पोलिसांनी पार पाडली. या बैठकीत आप्तांच्या त्रयस्तपणाची अनेक उदहारणं नोंदली गेली. आपलेच आपल्या जीवावर उठणे कशाला म्हणतात, त्याचाही खुलासा झाला. अनेक वृद्धांनी कातर स्वरात पोटच्या मुलांच्या निष्ठूरपणाचे गाऱ्हाणे ऐकवले. त्याने मोठे व्हावे, चांगल्या कामधंद्याला लागावे म्हणून आम्ही हालअपेष्टा भोगल्या. पोटाला पीळ देऊन त्याचे भरणपोषण केले. त्याची प्रत्येक इच्छा पूर्ण केली. आता तो मोठा झाला. लठ्ठ पगार कमवतो, उडवतो. आम्हाला मात्र त्याने आता वाऱ्यावर सोडले आहे. आपुलकी आणि प्रेमाचे चार शब्द सोडा, दोन वेळचे जेवण, औषधोपचाराचीही सोय करायला नाही. मागून, म्हणूनही पैसे देत नाही, असे सांगून अनेकजणांनी आपला गहिवर मांडला.