कार्यकारी महापौरांची लेटलतिफांना तंबी
By Admin | Updated: June 1, 2017 02:46 IST2017-06-01T02:46:34+5:302017-06-01T02:46:34+5:30
महापौर नंदा जिचकार यांनी गेल्या महिन्यात केलेल्या आकस्मिक पाहणीत बरेच कर्मचारी विलंबाने कार्यालयात

कार्यकारी महापौरांची लेटलतिफांना तंबी
वेळेत हजर रहा : अन्यथा कारवाई करणार
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापौर नंदा जिचकार यांनी गेल्या महिन्यात केलेल्या आकस्मिक पाहणीत बरेच कर्मचारी विलंबाने कार्यालयात येत असल्याचे उघडकीस आले होते. महापौरांच्या या पाहणीनंतर कर्मचाऱ्यांवर वचक बसेल, अशी अपेक्षा होती. मात्र, तसे झालेले नाही. कार्यकारी महापौर दीपराज पार्डीकर यांनी मंगळवारी केलेल्या आकस्मिक पाहणीत बरेच कर्मचारी वेळेत कार्यालयात उपस्थित नसल्याचे दिसून आले. आता पार्डीकर यांनी लेटलतिफांवर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
महापौर नंदा जिचकार या बाहेरगावी गेल्या आहेत. त्यामुळे पार्डीकर यांच्याकडे महापौरपदाचा कार्यभार सोपविण्यात आला आहे. महापालिकेच्या सर्व झोन कार्यालयाच्या वेळा बदलविण्यात आलेल्या आहेत. सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत शहरातील सर्व झोनचे कामकाज आज मंगळवारपासून सुरू होणार होते. त्या पार्श्वभूमीवर प्रभारी महापौर पार्डीकर यांनी मंगळवारी नेहरूनगर झोन व लकडगंज झोनमध्ये पाहणी केली. नेहरूनगर झोनमध्ये ७० पैकी फक्त १० कर्मचारी उपस्थित होते. यावर पार्डीकर यांनी नाराजी व्यक्त केली. विलंबाने येणाऱ्या कर्मचाऱ्यांना खडेबोल सुनावले. उद्यापासून वेळेत हजर न राहिल्यास कारवाई करण्यात येईल, अशी तंबी त्यांनी दिली. लकडगंज झोनमध्येही तीच परिस्थिती दिसून आली.
नेहरूनगर व लकडगंज झोनमधील बायोमेट्रिक मशीन्समध्ये बिघाड असल्याने ती त्वरित दुरुस्त करावी. कर्मचाऱ्यांनी वेळेत येऊन नागरिकांच्या सर्व समस्या सोडव्यावात, नागरिकांची कुठलीही तक्रार आल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पार्डीकर यांनी यावेळी दिला. यानंतर पार्डीकर यांनी दोन्ही झोनच्या विविध विभागांची पाहणी केली व व्यवस्थेचा आढावा घेतला. झोनमध्ये असलेल्या समस्या जाणून घेतल्या व त्याची पूर्तता लवकरात लवकर करण्यात येईल, असे आश्वासन दिले. या पाहणीदरम्यान लकडगंज झोनचे अतिरिक्त सहायक अधीक्षक राजेंद्र बावनकर, राजेंद्र गोतमारे उपस्थित होते.