‘एमआरओ’ला जूनमध्ये परवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2015 02:11 IST2015-05-06T02:11:30+5:302015-05-06T02:11:30+5:30
बोर्इंग एमआरओच्या टॅक्सी-वेचे पहिले यशस्वी प्रात्यक्षिक २२ एप्रिलला घेतल्यानंतर प्रत्यक्ष कामाचा परवाना जूनच्या अखेरपर्यंत मिळण्याची शक्यता

‘एमआरओ’ला जूनमध्ये परवाना
नागपूर : बोर्इंग एमआरओच्या टॅक्सी-वेचे पहिले यशस्वी प्रात्यक्षिक २२ एप्रिलला घेतल्यानंतर प्रत्यक्ष कामाचा परवाना जूनच्या अखेरपर्यंत मिळण्याची शक्यता एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्व्हिसेस लिमिटेडचे (एआयईएसएल) उपमहाव्यवस्थापक सुनील अरोरा यांनी त्यावेळी व्यक्त केली होती. प्रात्यक्षिक अहवाल नागरी विमान उड्ड्यण महासंचालनालयाकडे त्यावेळीच पाठविण्यात आला होता. त्यावर प्रक्रिया पूर्ण झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
बोर्इंगचे ७७७-३०० ईआर हे विमान डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीवर उतरले होते. टॅक्सी-वे वरून एमआरओमध्ये यशस्वीपणे नेण्यात आले आहे. एमआरओची जबाबदारी एअर इंडियाची उपकंपनी एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्व्हिसेसकडे सोपविण्यात आली आहे.
मिहान-सेझमध्ये ५० एकर जागेवर जवळपास एमआरओ उभारला आहे. संपूर्ण प्रकल्प व जमीन एअर इंडियाची आहे. मात्र, तांत्रिक उभारणी बोर्इंगने केली आहे. मध्यम आकाराच्या (बोर्इंग ७३७) तीन विमानांची एकावेळी दुरुस्ती करण्याची रचना या एमआरओमध्ये आहे. सुमारे ५५० कोटी रुपये गुंतवणुकीची योजना एअर इंडिया आणि बोर्इंगची आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या टॅक्सी वेची लांबी २.६५ कि़मी. असून रुंदी ४० मीटर आहे. ६० टनाच्या विमानांचा भार सोसण्यासाठी जाडी १५ फूट आहे. सुमारे तीन ते चार पदरी क्राँक्रीटचा हा मार्ग आहे. दोन्ही बाजूला प्रत्येकी २३.५ मीटर जागा सोडली आहे. बांधकाम पीबीए इन्फ्रास्ट्रक्चरने केले आहे. बोर्इंगसाठीचा टॅक्सी-वे शिवणगावाला जाणाऱ्या रस्त्यात आहे. यामुळे शिवणगावसाठी विशेष गेट उभारले आहे. विमानांची ये-जा सुरू असताना हे गेट बंद ठेवण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)