क्षेत्रिय बॅडमिंटन अकादमीसाठी सहकार्य करू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2017 00:27 IST2017-11-04T00:27:17+5:302017-11-04T00:27:57+5:30
बॅडमिंटन अकादमीचे पश्चिम क्षेत्रिय केंद्र नागपुरात सुरू करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणी मंंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी दिले.

क्षेत्रिय बॅडमिंटन अकादमीसाठी सहकार्य करू
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बॅडमिंटन अकादमीचे पश्चिम क्षेत्रिय केंद्र नागपुरात सुरू करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणी मंंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी दिले.
कोराडी रोडवरील विभागीय क्रीडा संकुलात आयोजित ८२ व्या सिनियर राष्टÑीय बॅडमिंटन स्पर्धेच्या सांघिक विजेत्यांना पुरस्कार वितरित केल्यानंतर गडकरी यांनी खेळांच्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे सांगितले. तत्पूर्वी, महाराष्ट्रÑ बॅडमिंटन संघटनेचे अध्यक्ष अरुण लखानी यांनी प्रास्तविकात क्षेत्रिय केंद्र नागपुरात सुरू करण्यास एमबीए उत्सुक असून जागा उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव महाराष्टÑ शासनाकडे दिल्याचे सांगून राज्य शासनाने सहकार्य करण्याची विनंती केली होती. गडकरी यांनी शासनाकडून कुठलेही सहकार्य कमी पडणार नसल्याचे स्पष्ट केले.
यावेळी आमदारद्वय डॉ. मिलिंद माने, सुधाकर देशमुख, कृष्णा खोपडे, आशिष देशमुख आणि डॉ. परिणय फुके यांच्यासह महापौर नंदा जिचकार, महामेट्रोचे सीएमडी बृजेश दीक्षित, एनडीबीए अध्यक्ष कुंदाताई विजयकर, सचिव मंगेश काशीकर, परिवहन सभापती बंटी कुकडे यांच्यासह बॅडमिंटन असोसिएशन आॅफ इंडिया आणि एमबीएचे पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते. ‘रौद्र बँड’ पथकाच्या सादरीकरणानंतर स्पर्धेचे ‘थिमसॉंग’ वाजविण्यात आले.
गडकरी यांच्याहस्ते ज्येष्ठ बॅडमिंटनपटू सी. डी. देवरस आणि प्रदीप गंधे यांचा मानपत्र, शाल, श्रीफळ स्मृतिचिन्ह तसेच एक लाख रुपये रोख देऊन आयोजन समितीच्यावतीने सत्कार करण्यात आला. सर्व पाहुण्यांना लखानी यांनी सन्मानचिन्हे प्रदान केली. ़
सांघिक स्पर्धेतील विजेता संघ पेट्रोलियन क्रीडा संवर्धन बोर्ड (पीएसपीबी) संघाला तीन लाख रुपयांचे पारितोषिक आणि चषक देण्यात आला. उपविजेता मध्य प्रदेश संघ दोन लाख रुपयांचा मानकरी ठरला. सेमीफायनलमध्ये पराभूत झालेल्या दोन्ही संघांना प्रत्येकी एक लाख २० हजार रुपये पुरस्कार मिळाला. याशिवाय उपांत्यपूर्व फेरीत पराभूत चार संघांना प्रत्येकी ६० हजार रुपये देण्यात आल्याची माहिती लखानी यांनी दिली.