जळू दे चिंतेचे बन, सुखाचा होऊदे ट्वेन्टी वन !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:08 IST2021-01-02T04:08:00+5:302021-01-02T04:08:00+5:30
एरवी प्रत्येक थर्टीफर्स्ट अमर्याद उधाणाचा वाटतो. यंदा कोरोनाच्या निर्बंधामुळे बार रात्री ११ वाजताच रिकामे झाले. बारमध्ये बसून एन्जॉय करण्यापेक्षा ...

जळू दे चिंतेचे बन, सुखाचा होऊदे ट्वेन्टी वन !
एरवी प्रत्येक थर्टीफर्स्ट अमर्याद उधाणाचा वाटतो. यंदा कोरोनाच्या निर्बंधामुळे बार रात्री ११ वाजताच रिकामे झाले. बारमध्ये बसून एन्जॉय करण्यापेक्षा मद्यशौकिनांनी खासगी ठिकाणे निवडून मर्यादित पार्ट्या केल्या. यामुळे सायंकाळी मद्यविक्रीची दुकाने फुल्ल होती. ऑनलाईन पार्सलवरही अनेकांचा भर होता. रस्त्यावरील गर्दी बरीच नियंत्रणात जाणवली. म्हणावा तसा उन्माद नव्हता. रस्त्यावर चालणारा धिंगाणा आणि नव्हता, सुसाट वेगाने गाड्या पळवणारे युवकही दिसले नाहीत.
....
मोहल्ला पार्टी जोरात
यदा मोहल्ला पार्टी आणि घरगुती पार्टी मात्र जोरात झाल्या. पोलिसांचा चोख बंदोबस्त आणि कोरोनाचे विघ्न पाहता बहुतेकांनी हा मध्यममार्ग निवडला. अनेकांनी कौटुंबिक सेलिब्रेशनलाच महत्त्व दिले. घरात सर्वांसोबत नववर्ष साजरे करण्यात आले.
.....
पोलिसांचा बंदोबस्त आणि प्रबोधन
पोलिसांनी यंदा चोख बंदोबस्त ठेवला होता. फुटाळा तलाव, अंबाझरी गार्डन यासह अनेक ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त होता. वाहनांची कसून तपासणी सुरू होती. बर्डीवर सायंकाळी स्वत: पोलीस आयुक्तांनी भेट दिली. त्यांच्या उपस्थितीत नागरिकांना फुले वाटून नववर्षाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. घरी बसा, कुटुंबासोबत सेलिब्रेशन करा आणि सुरक्षित राहा असा संदेश पोलिसांकडून दिला जात होता.
......
कोरोनाची लस लवकर येऊ दे रे देवा...
नागपूर : नववर्षाच्या पूर्वसंध्येला अनेकांनी करुणा भाकली. जुन्या वर्षात दु:ख आणि भय अनुभवले. नवे वर्ष तरी सुखाचे जाऊ दे, कोरोनाची लस लवकर येऊ दे आणि हा विळखा लवकर मिटू दे, अशी प्रार्थना अनेकांनी केली. वर्षभरापूर्वी सर्वांनीच नववर्षाचे स्वागत जल्लोषात केले होते. फटाके फोडले, केक कापला, कॉलनीतल्या पोरांनी डीजे काय वाजवला, पण हाय रे दैवा...! तीन महिने सोडले तर अख्खे वर्ष आसवांनी भिजले, त्यात आशा वाहून गेल्या. देवा, आता नको दाखवू पुन्हा तसे दिवस ! नवे वर्ष तरी सुखाचे येऊ दे रे बाबा, कोरोनाची लस लवकर येऊ दे, आमचे गोकुळ पुन्हा फुलू दे ! अशीच सर्वांची भावना होती.
....