नागपूर : 'इतके वर्ष कष्ट केले आता बरे दिवस आले आहेत. आता आम्हाला काही मिळू द्या, असे अनेकांना वाटते. मात्र सध्या श्रावणमास सुरू आहे व मला किंवा आम्हाला काही मिळावे हा शिवाचा स्वभाव नाही. शिववृत्तीचे आचरण करणाऱ्यांमध्ये त्यागाची भावना असायला हवी', असे प्रतिपादन करत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी सत्ताकेंद्रित फायदा पाहणाऱ्यांचे कान टोचले आहे. नागपुरातील दिनदयाल नगरातील पांडुरंगेश्वर शिवमंदिरात श्रावणमासानिमित्त त्यांच्या हस्ते अभिषेक व पूजन झाले. त्यावेळी ते बोलत होते.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
'जगाच्या सगळ्या समस्यांमागे मनुष्याचा हावरटपणा व कट्टरता आहे. कट्टरतेतून राग-द्वेष निर्माण होतात व त्यातून युद्ध होतात. मलाच पाहिजे ही स्वार्थाची वृत्ती आणि भेदभाव या मनुष्याच्या प्रवृत्तीच्या काळी बाजू आहेत. ही प्रवृत्ती बदलली पाहिजे. हीच प्रवृत्ती बदलणे म्हणजे शिवाचे पूजन करणे होय', असे विधान त्यांनी केले.
'परस्परविरोधी बाबींची सांगड घालून नवनीत कसे काढायचे हे परंपरेने आपल्याला ठावूक आहे. त्यामुळे ती परंपरा पुढे नेणाऱ्या पूजा, यात्रा यामागील भाव ओळखून कार्य करत संस्कार आपल्या अंगी बाळगला पाहिजे. जगाला दिलासा देण्याची ताकद आपल्यातच आहे', असा विश्वासदेखील त्यांनी व्यक्त केला.
यावेळी त्यांच्या हस्ते आरतीदेखील झाली. मंचावर महानगर संघचालक राजेशजी लोया, दिनदयाल नगर समुत्कर्ष संस्थेचे अध्यक्ष दिलीपजी कटारकर प्रामुख्याने उपस्थित होते.
कावडियांनी कृतीमागील भाव समजून घ्यावा
'शिवाची भक्ती सर्व पंथांचे लोक करतात. कावडीयांची मोठी परंपरा आपल्या देशात आहे. इकडचे पाणी दुसरीकडे नेतात. आपल्याला जे चांगले सापडले ते आपल्याकडे न ठेवता इतरांपर्यंत न्यायचे हा त्यामागचा विचार आहे. प्रत्येक कृतीच्या मागे एक भाव असतो व तो समजून काम केले तर ती संस्कृती होते व त्यातूनच संस्कार निर्माण होतात. त्यामुळे परंपरेच्या कृतीमागील भाव समजून घ्यावा', असे आवाहन सरसंघचालकांनी केले.
काळ ओळखून योग्य पावले टाका, अन्यथा विनाश
'जगात परिवर्तन येत आहे असे विचारवंत म्हणतात. या बदलत्या काळात माणसाने योग्य दिशा धरली नाही तर तो विनाशाचा काळ ठरू शकतो. मात्र काळ ओळखून नीट पावले योग्य दिशेने टाकली तर मनुष्याच्या जीवनाचे नवीन उन्नत स्वरुप उभे राहते. जगात असे स्वरुप भारतीयांच्या नेतृत्वाखालीच उभे राहू शकते', असे प्रतिपादन त्यांनी केले.