जळू दे चिंतेचे वन, सुखाचा होऊदे ट्वेन्टी वन !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2021 12:15 AM2021-01-01T00:15:06+5:302021-01-01T00:18:19+5:30

New year celebration ‘गतकाळाच्या जाळून स्मृती, धरा उद्याची उंच गुढी’ असाच काहीसा आशावाद मनात साठवत आणि गतवर्षातील कडूगोड आठवणींना उजाळा देत नागपूरकरांनी २०२० ला गुडबाय करीत नव्या २०२१ चे धडाक्यात घरीच स्वागत केले.

Let the forest of anxiety burn, let the forest of happiness be twenty-one! | जळू दे चिंतेचे वन, सुखाचा होऊदे ट्वेन्टी वन !

जळू दे चिंतेचे वन, सुखाचा होऊदे ट्वेन्टी वन !

Next
ठळक मुद्देकडूगोड आठवणींना उजाळा देत नववर्षाचे जल्लोषात स्वागत

लोकमत  न्यूज  नेटवर्क

नागपूर : ‘गतकाळाच्या जाळून स्मृती, धरा उद्याची उंच गुढी’ असाच काहीसा आशावाद मनात साठवत आणि गतवर्षातील कडूगोड आठवणींना उजाळा देत नागपूरकरांनी २०२० ला गुडबाय करीत नव्या २०२१ चे धडाक्यात घरीच स्वागत केले. सेलिब्रेशनशिवाय नववर्षाचे स्वागत नाही, ही अलीकडे रूढ झालेली परंपरा ! पण कोरोनामुळे बदललेल्या विचारसरणीचा यंदा काही प्रमाणात परिणाम जाणवलेला दिसला. मर्यादित स्वरूपात आणि शक्यतो सहकुटुंब सेलिब्रेशन करण्याकडे अनेकांचा कल दिसला. परिणामत: दरवर्षी रस्त्यावर दिसणारी हुल्लडबाजांची गर्दी या वर्षी कमी जाणवली. सेलिब्रेशन झाले, पण इनडाेअर!

दरवर्षीसारखा ‘एन्जाॅयमेंट’चा मूड टाळत नववर्षाचे स्वागत करणारी तरुणाई यंदा बरीच समजदार झाल्यासारखी वाटत होती. शहरातील बार आणि परमिटरूमला रात्री ११ वाजेपर्यंत परवानगी असल्याने आणि फटाक्यांवर बंदी घातल्याने उत्साही नागरिकांचा हिरमोड झाला. तरीही दिवाळीतील वाचलेले फटाके काही प्रमाणात फुटलेच !

सेलिब्रेशन दुपारपासूनच

नागपुरातील फुटाळा तलाव चौपाटी कायम चैतन्याने आणि तरुणाईने बहरलेली असते. थर्टी फर्स्ट आणि नववर्षाच्या स्वागताचा उत्सव म्हटल्यावर पुन्हा बहर येणारच ! मात्र यंदा चौपाटीवर शुकशुकाट होता. कसलेही आयोजन नव्हते. पोलिसांचा बंदोबस्त होता. तरीही मित्रांचे टोळके हजेरी लावून जात होते. येथे सेलिब्रेशन मात्र झाले नाही. मात्र मित्रमैत्रिणींनी एकमेकांना भेटून दुपारपासूनच सेलिब्रेशन केले.

सोशल मीडियावर शुभेच्छांचा पाऊस

नववर्षाच्या स्वागताचे आणि मावळत्या वर्षाला निरोप देणारे संदेश सकाळपासूनच फिरायला लागले होते. प्रत्यक्ष भेटी टाळत मोबाईलवरून मेसेज पाठवून आणि संपर्क करून शुभेच्छांची देवाणघेवाण झाली. यामुळे नेटवर्क जाम झाल्याचा अनुभव अनेकांना आला.

ऑनलाईन पार्सलवर भर, रस्ते नियंत्रित

एरवी प्रत्येक थर्टीफर्स्ट अमर्याद उधाणाचा वाटतो. यंदा कोरोनाच्या निर्बंधामुळे बार रात्री ११ वाजताच रिकामे झाले. बारमध्ये बसून एन्जॉय करण्यापेक्षा मद्यशौकिनांनी खासगी ठिकाणे निवडून मर्यादित पार्ट्या केल्या. यामुळे सायंकाळी मद्यविक्रीची दुकाने फुल्ल होती. ऑनलाईन पार्सलवरही अनेकांचा भर होता. रस्त्यावरील गर्दी बरीच नियंत्रणात जाणवली. म्हणावा तसा उन्माद नव्हता. रस्त्यावर चालणारा धिंगाणा आणि नव्हता, सुसाट वेगाने गाड्या पळवणारे युवकही दिसले नाहीत.

मोहल्ला पार्टी जोरात

यदा मोहल्ला पार्टी आणि घरगुती पार्टी मात्र जोरात झाल्या. पोलिसांचा चोख बंदोबस्त आणि कोरोनाचे विघ्न पाहता बहुतेकांनी हा मध्यममार्ग निवडला. अनेकांनी कौटुंबिक सेलिब्रेशनलाच महत्त्व दिले. घरात सर्वांसोबत नववर्ष साजरे करण्यात आले.

पोलिसांचा बंदोबस्त आणि प्रबोधन

पोलिसांनी यंदा चोख बंदोबस्त ठेवला होता. फुटाळा तलाव, अंबाझरी गार्डन यासह अनेक ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त होता. वाहनांची कसून तपासणी सुरू होती. बर्डीवर सायंकाळी स्वत: पोलीस आयुक्तांनी भेट दिली. त्यांच्या उपस्थितीत नागरिकांना फुले वाटून नववर्षाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. घरी बसा, कुटुंबासोबत सेलिब्रेशन करा आणि सुरक्षित राहा असा संदेश पोलिसांकडून दिला जात होता.

कोरोनाची लस लवकर येऊ दे रे देवा...

नागपूर : नववर्षाच्या पूर्वसंध्येला अनेकांनी करुणा भाकली. जुन्या वर्षात दु:ख आणि भय अनुभवले. नवे वर्ष तरी सुखाचे जाऊ दे, कोरोनाची लस लवकर येऊ दे आणि हा विळखा लवकर मिटू दे, अशी प्रार्थना अनेकांनी केली. वर्षभरापूर्वी सर्वांनीच नववर्षाचे स्वागत जल्लोषात केले होते. फटाके फोडले, केक कापला, कॉलनीतल्या पोरांनी डीजे काय वाजवला, पण हाय रे दैवा...! तीन महिने सोडले तर अख्खे वर्ष आसवांनी भिजले, त्यात आशा वाहून गेल्या. देवा, आता नको दाखवू पुन्हा तसे दिवस ! नवे वर्ष तरी सुखाचे येऊ दे रे बाबा, कोरोनाची लस लवकर येऊ दे, आमचे गोकुळ पुन्हा फुलू दे ! अशीच सर्वांची भावना होती.

Web Title: Let the forest of anxiety burn, let the forest of happiness be twenty-one!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.