विद्यार्थ्यांनी घेतले स्पर्धा परीक्षा तयारीचे धडे
By Admin | Updated: January 12, 2017 01:42 IST2017-01-12T01:42:44+5:302017-01-12T01:42:44+5:30
लोकमत युवा नेक्स्ट व अॅग्ररिअन राठोड अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयएएस, आयपीएस,

विद्यार्थ्यांनी घेतले स्पर्धा परीक्षा तयारीचे धडे
लोकमत युवा नेक्स्ट व अॅग्ररिअनच्या राठोड अकॅडमीचा उपक्रम
नागपूर : लोकमत युवा नेक्स्ट व अॅग्ररिअन राठोड अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयएएस, आयपीएस, डेप्युटी कलेक्टर, डीवायएसपीचे ध्येय बाळगणारे वर्ग पाचवी ते पदवीपर्यंतच्या विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांकरिता ८ जानेवारी रोजी मोफत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यशाळेत मार्गदर्शन करताना प्रा. सुधाकर राठोड म्हणाले, आज युवा पिढीसमोर अनेक आव्हाने आहेत. परंतु त्यासोबतच अनेक पर्यायही आहेत. स्पर्धा परीक्षा हाही त्यातलाच एक पर्याय आहे. ज्याला अनेक विद्यार्थी निवडत असतात. ध्येय स्पष्ट, प्रयत्न प्रामाणिक आणि तयारीची दिशा योग्य असेल तर यश मिळवणे कठीण काम नाही.
हे सांगतानाच प्रा. राठोड यांनी यूपीएससी आणि एमपीएससी परीक्षेबाबत सर्वंकष माहिती दिली. व्याख्यानाच्या पहिल्या टप्प्यात त्यांनी विद्यार्थी आणि पालकांना मानसिकरीत्या तयार होण्यासाठी या परीक्षांची ओळख करून दिली. सोबतच अभ्यासक्रमही समजावून सांगितला.
एमपीएससी, यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर कुठली नोकरी मिळते, प्राथमिक परीक्षा, मुख्य परीक्षा, प्रत्यक्ष मुलाखत या सगळ्यांची तयारी कशी करायची, कुणी कुठले क्षेत्र निवडावे, याबाबत माहिती दिली. यावेळी विद्यार्थी आणि पालकांनी त्यांना विविध प्रश्न विचारून आपल्या शंकांचे समाधान करून घेतले. या कार्यक्रमाला शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक सुमित जोशी, संचालन पूनम महात्मे तर आभार अनुश्री बक्षी यांनी मानले.(प्रतिनिधी)