लाईव्ह सर्जरीतून दिले कौशल्याचे धडे
By Admin | Updated: February 1, 2015 00:58 IST2015-02-01T00:58:14+5:302015-02-01T00:58:14+5:30
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातून तब्बल १५ शस्त्रक्रियांचे थेट प्रक्षेपण (लाईव्ह सर्जरी) ‘मॅसिकॉन-२०१५’ या राज्यस्तरीय परिषदेत करण्यात आले. यावेळी देशभरातून

लाईव्ह सर्जरीतून दिले कौशल्याचे धडे
‘मॅसिकॉन-२०१५’ : मेडिकलमधून थेट १५ शस्त्रक्रियांचे प्रक्षेपण
नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातून तब्बल १५ शस्त्रक्रियांचे थेट प्रक्षेपण (लाईव्ह सर्जरी) ‘मॅसिकॉन-२०१५’ या राज्यस्तरीय परिषदेत करण्यात आले. यावेळी देशभरातून आलेल्या प्रसिद्ध शल्यक्रियातज्ज्ञांनी विशेष कौशल्याच्या शस्त्रक्रियेविषयी मार्गदर्शन केले.
‘रुग्ण व डॉक्टरांसाठी सुरक्षित शस्त्रक्रिया’ या विषयावर आयोजित या परिषदेच्या दुसऱ्या दिवशी अद्यावत तंत्रज्ञान व संगणकामुळे अनेक शस्त्रक्रिया कशा यशस्वी होतात हे लाईव्ह सर्जरीच्या मदतीने तज्ज्ञांनी दाखवून दिले. यावेळी उपस्थित केलेल्या शंकांचे निरसनही या तज्ज्ञांनी केले.
या शस्त्रक्रियांमध्ये दूर्बिणीद्वारे (लेप्रोस्कोपी) १३ आणि ३ खुल्या शस्त्रक्रियांचा समावेश होता. याप्रसंगी तायवानमधील प्रसिद्ध शल्यक्रियातज्ज्ञ डॉ. वांग यांनी ‘बॅरिअॅट्रिक’ (लठ्ठपणावरील सर्जरी) शस्त्रक्रियेविषयी लाईव्ह व्हिडिओ सर्जरीतून माहिती दिली. शस्त्रक्रियेचा बारकाईने अभ्यास करून यातील तंत्रज्ञान समजून घेणे आवश्यक असल्याचे विचार यावेळी तज्ज्ञांनी मांडले.
दुर्मिळ शस्त्रक्रियेवर मार्गदर्शन
अत्यंत गुंतागुंतीची व दुर्मिळातील दुर्मिळ शस्त्रक्रियेची माहिती व्हिडीओ प्रेझेन्टेशनच्यामदतीने तज्ज्ञांना दिली. याचा फायदा पदव्युत्तर विद्यार्थ्यांनी घेतला.
सुरुवातीला दूर्बिणीद्वारे करण्यात येणारी शस्त्रक्रिया आणि आता त्यात झालेला बदल या विषयावर डॉ. अभय दळवी यांनी मार्गदर्शन केले. याशिवाय विविध विषयांवर डॉ. मिलिंद रुके, डॉ. सी. पलानिवेलू यांनीही मार्गदर्शन केले.
मेडिको-लिगलवर चर्चा
रुग्ण आणि डॉक्टरांमध्ये संवाद कमी झाला आहे. परिणामी रुग्णालयांत ताणतणावाचे प्रसंग वाढले आहेत. यावर उपाय म्हणून रुग्णांशी संवाद साधून उपचाराची माहिती देणे, त्यातील धोके, खर्च हेदेखील पारदर्शकपणे सांगणे आवश्यक झाल्याचे मत आणि इस्पितळांनी घ्यावयाची खबरदारी, कायदा काय म्हणतो यावर आज चर्चा झाली. नियंत्रकाच्या भूमिकेत डॉ. विवेक तिलवानी होते. चर्चेत वरिष्ठ शल्यक्रियातज्ज्ञ डॉ. वाय.एस. देशपांडे, डॉ. अनिल बोबडे, अॅड. भानुदास कुळकर्णी, डॉ. अनिरुद्ध देऊस्कर, डॉ. आशुतोष आपटे आदींचा सहभाग होता. परिषदेच्या यशस्वीतेसाठी अध्यक्ष डॉ. राज गजभिये, उपाध्यक्ष डॉ. वाय.एस. देशपांडे, सचिव डॉ. ए.एम. कुरेशी, डॉ. राजेश सिंगवी, डॉ. ए. सिन्हा, डॉ. विक्रम देसाई, डॉ. प्राची महाजन आदी सहकार्य करीत आहेत. (प्रतिनिधी)