कोल्हापुरात बिबट्याचा थरार
By Admin | Updated: January 2, 2015 01:22 IST2015-01-02T01:22:53+5:302015-01-02T01:22:53+5:30
हल्ल्यात चार जखमी : रुईकर कॉलनी भयकंपित; गर्दी अनावर... बिबट्याच्या जिवावर; चांदोलीकडे नेताना मृत्यू

कोल्हापुरात बिबट्याचा थरार
कोल्हापूर : नववर्षाची पहिली सकाळ शहरातील रुईकर कॉलनी परिसराला भयकंपित करणारी ठरली. सकाळी सातपासून चार तास चक्क रस्त्यावरूनच बिबट्या फिरू लागला. कुणीतरी ही माहिती सोशल मीडियावर शेअर केल्यावर लोकांचे लोंढे या परिसराकडे लागले. गर्दी पाहून बिबट्या बिथरला. बंगल्यातून, झुडपातून वाट दिसेल तिकडे धावणाऱ्या बिबट्याला चार तासाच्या अथक प्रयत्नानंतर पकडण्यात यश आले. त्याला चांदोली अभयारण्यात सोडण्यासाठी नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. या दरम्यान बिबट्याच्या हल्ल्यात चारजण जखमी झाले.
आज, गुरुवारी सकाळी सातच्या सुमारास चार तास चक्क रस्त्यावरून बिबट्याच फिरू लागल्याने लोकांची भीतीने गाळण उडाली. तोपर्यंत कुणीतरी ही माहिती सोशल मीडियावर शेअर केल्यावर लोकांचे लोंढे या परिसराकडे लागले. यामुळे बिबट्या बंगल्यातून, झुडपातून वाट दिसेल तिकडे जाऊ लागला मध्येच त्याने एका तरुणावर हल्ला केला. शेवटी उद्योजक अरविंद देशपांडे यांच्या बंगल्यात तो घुसला. त्याला पकडण्यासाठी वनविभागासह कोणत्याच यंत्रणेकडे काहीच साधने नव्हती.