लाव्हात हल्लेखोरांचा हैदोस

By Admin | Updated: June 5, 2016 02:41 IST2016-06-05T02:41:12+5:302016-06-05T02:41:12+5:30

डीजे बंद करण्याची सूचना केली म्हणून संतप्त जमावाने एका अपार्टमेंटवर जोरदार हल्ला चढवला.

Led by the attackers | लाव्हात हल्लेखोरांचा हैदोस

लाव्हात हल्लेखोरांचा हैदोस

डीजे बंद करायला सांगितला म्हणून वाद : विटा, खुर्चीने मारहाण
नागपूर : डीजे बंद करण्याची सूचना केली म्हणून संतप्त जमावाने एका अपार्टमेंटवर जोरदार हल्ला चढवला. हल्लेखोरांनी दगड, विटा, खुर्च्यांनी केलेल्या मारहाणीत दोघांना जबर दुखापत झाली असून, लाव्हा (वाडी) परिसरात गुरुवारी रात्री घडलेल्या या घटनेने तणाव निर्माण झाला होता.
लाव्हा ग्रामपंचायतचे ग्रामसेवक दादाराव डोईफोडे यांच्या मुलीच्या जन्मदिवसानिमित्त तिरुपती बालाजी मंगल कार्यालयात शुक्रवारी सायंकाळी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तेथे डीजेही लावण्यात आला होता. उशिरा रात्रीपर्यंत डीजे वाजत असल्याने शेजाऱ्यांना त्रास होत होता. त्यामुळे श्री साई सृष्टी अपार्टमेंटमदील दोन तरुण कार्यक्रमस्थळी गेले आणि त्यांनी डीजे बंद करण्याची सूचना केली. त्याला दाद न देता कार्यक्रमातील काही जणांनी या दोघांना मारहाण केली. त्यामुळे हे दोघे आपल्या सहनिवासात पळून आले. पाठोपाठ २० ते २५ जणांचा जमाव आरडाओरड करीत सोसायटीत शिरला. सिक्युरिटी गार्डला मारहाण करीत आरोपींनी विटा,खुर्च्या फेकून मारत सोसायटीत हैदोस घातला. त्यामुळे पलाश सोनी (वय २२) आणि दिलीप शेंडे (वय ४०) गंभीर जखमी झाले. या सर्वांना ग्रामसेवक चिथावणी देत होता. या घटनेने संतप्त झालेल्या सोसायटीतील नागरिकांनी हल्लेखोरांकडे धाव घेताच ते पळून गेले. जबर जखमी झालेल्या सोनी यांना मेयोत तर शेंडेंना वाडीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले. विशेष म्हणजे, दारूच्या नशेत हैदोस घालणाऱ्या हल्लेखोरांना शेंडे समजावत होते. हल्लेखोरांनी त्यांनाच विटा-दगडांनी बेशुद्ध होईपर्यंत मारले.दरम्यान, प्रकरणाची वरिष्ठांनी दखल घेतल्यानंतर वाडी पोलिसांनी आरोपी अमोल सुधाकर डोईफोडे (वय २१), राजन ऊर्फ मुन्ना देवीदास थूल (वय ३२), सचिन जोगीनाथ नितनवरे (वय २८), उमेश वामनराव ठाकरे (वय १९) आणि युवराज भगवानजी उकडे (वय २८) यांना अटक केली. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Led by the attackers