‘त्या’ लेक्चररचा राजीनामा
By Admin | Updated: July 12, 2014 02:22 IST2014-07-12T02:22:00+5:302014-07-12T02:22:00+5:30
शासकीय दंत महाविद्यालयाचा एक कंत्राटी लेक्चरर मागील काही महिन्यांपासून असभ्य वर्तवणूक करीत असल्याचा आरोप इंटर्न्सच्या विद्यार्थिनींनी केला होता.

‘त्या’ लेक्चररचा राजीनामा
नागपूर : शासकीय दंत महाविद्यालयाचा एक कंत्राटी लेक्चरर मागील काही महिन्यांपासून असभ्य वर्तवणूक करीत असल्याचा आरोप इंटर्न्सच्या विद्यार्थिनींनी केला होता. या प्रकरणाची चौकशी महाविद्यालयाच्या महिला तक्रार निवारण समितीने करीत शुक्रवारी आपला अहवाल सादर केला. यात त्या लेक्चररवर आरोप सिद्ध झाले, परंतु महाविद्यालय प्रशासनाने त्याचे भविष्य खराब होऊ नये म्हणून त्याला नोकरीवरून न काढता राजीनामा देण्यास भाग पाडले.
दंत महाविद्यालयात सहा महिन्यांपूर्वी कंत्राट पद्धतीवर तो रुजू झाला. मागील काही महिन्यांपासून इंटर्न्सच्या विद्यार्थिंनीना ‘एसएमएस’ पाठविणे, फेसबुकवर पाठविलेल्या फोटोला ‘लाईक’ करण्याचा आग्रह धरणे, विद्यार्थिनींना पार्टी मागणे किंवा पार्टी देतो म्हणून त्यांना बोलविणे, विद्यार्थिनींना विभागात बोलवून आपल्यासमोर उभे करणे, वाईट नजरेने पाहणे, विशिष्ट मुलींनाच विविध कॅम्पमध्ये पाठविणे, नाही गेल्यास त्यांना झापणे, परीक्षेत कमी गुण देण्याची धमकी देणे आदी तक्रारींचा पाऊस विद्यार्थिंनींनी आठवड्यापूर्वी डॉ. हजारे यांच्याकडे पाडला. त्यांनी हे प्रकरण महिला तक्रार निवारण समितीकडे पाठविले. चार सदस्यीय चमूने याची चौकशी केली. यात अधिष्ठाता, एक वरिष्ठ महिला डॉक्टर व दोन सदस्या बाहेरच्या होत्या. चौकशीमध्ये तो लेक्चरर दोषी आढळून आला. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार आज त्याच्यावर कारवाई होणार होती. या संदर्भात डॉ. विनय हजारे यांच्याशी संपर्क साधला असता, संपर्क होऊ शकला नाही. (प्रतिनिधी)